फक्त नागपंचमीदिवशी उघडते हे मंदिर


हिंदू संस्कृतीत नागपूजा समाविष्ट आहे. देशभरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. देशात अनेक ठिकाणी नागमंदिरे आहेत तर जवळजवळ प्रत्येक देवळात नागाची प्रतिमा तरी असतेच. उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगात समाविष्ट असलेल्या महाकाल मंदिरात तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नागचंद्रेश्वर मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जे फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडले जाते. या दिवशी या मंदिरात सरासरी २ लाख भाविक दर्शनासाठी येतात. या एकाच दिवशी या मंदिरातील प्रतिमेची पूजा केली जाते.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे देवळातील प्रतिमेत नागावर शिव पार्वती व गणेश विराजमान आहेत. सर्वसाधारण पणे विष्णु व लक्ष्मी नागावर विराजमान असतात. देशात या प्रकारची ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागराज तक्षक या मंदिरात उपस्थित असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या दिवशी या मंदिरात दर्शन केल्यास सर्पदोष नाहिसा होतो असाही समज आहे. श्रीरामाने या मंदिरात नागपूजा केली होती असेही सांगितले जाते.


मंदिरातील प्रतिमा ११ व्या शतकातील असून ती नेपाळ मधून आणली गेली आहे. दहा फण्याच्या नागावर शिवपार्वती व गणेश विराजमान आहेत. ही मूर्ती अतिशय प्राचीन आहे. पौराणिक कथेनुसार तक्षक सर्पाने शंकराची घोर तपस्या केली तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला अमरत्व दिले व त्यानंतर तक्षक शंकरासोबतच राहिले. असे सांगतात की परमार राजा भोज याने हे मंदिर १०५० साली बांधले होते व त्याच्या जीर्णोद्धार १७३२ साली राणोजीराजे सिंदीया यांनी केला.

Leave a Comment