मध्य प्रदेशात गाजत असलेल्या व्यापम घोटाळ्यात नेमके कोण गुंतलेले आहे आणि हा घोटाळा कसा राबवला गेला आहे यावर अजून बराच प्रकाश पडायचा आहे. परंतु २००८ सालपासून गाजत असलेल्या या घोटाळ्यात सर्वात अधिक प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेणारी घटना कोणती असेल तर ती म्हणजे या प्रकरणातील आरोपींचे होणारे गूढ मृत्यू. आजवर चौकशी सुरू असताना म्हणजे २०१३ पासून या प्रकरणात आरोपी असलेल्या किंवा संभावित साक्षीदार असलेल्या ४० लोकांचे संशयास्पदरित्या मृत्यू झालेले आहेत. या गूढ मृत्यूपैकी एकाचाही शोध लागलेला नाही. परंतु काल या प्रकरणातला ४० वा मृत्यू नोंदला गेला. मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील महाराजपूर या गावचा तरुण प्रताप यादव याने काल आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे.
व्यापम : आणखी एक बळी
प्रवीण यादव याने मोरेना येथे असलेल्या आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आजवर मरण पावलेल्या लोकांमध्ये यातले साक्षीदार, आरोपी आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. हे सगळे लोक अतीशय गूढरित्या मरण पावले आहेत. त्याचबरोबर जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरुण शर्मा आणि आजतक या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अक्षय सिंग हेही मरण पावलेले आहेत. त्यांचे मृत्यू संशयास्पदरित्या गूढ पध्दतीने झालेले दिसतात. वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असलेल्यांची निवड करणे, त्याचबरोबर पोलीस भरती आणि काही अधिकार्यांच्या पदांच्या जागा भरणे यासाठी या परीक्षा घेतल्या जात होत्या. व्यापम घोटाळ्यामध्ये जेवढ्या परीक्षा गुंतलेल्या आहेत. तेवढ्यांमध्ये सुमारे ३२ लाख विद्यार्थी बसलेले होते.
तशा या प्रकरणातील तक्रारी १९९५ नंतर यायला सुरूवात झाली आणि २००० साली पहिला गुन्हा दाखल झाला. २००९ सालपर्यंत या प्रकरणाचा तपास जारी होता. मात्र या दरम्यानच्या काळात अशी काही स्फोटक माहिती समोर यायला लागली की हा घोटाळा फार व्यापक असल्याचे लक्षात आले आणि तिथून चौकशीचा वेग वाढवण्यात आला. २००९ पर्यंत हा भ्रष्टाचार एका टोळीचा असल्याचे मानले जात नव्हते. मात्र २००९ नंतर जे पुरावे समोर आले त्यावरून या प्रकरणाची व्याप्ती लक्षात यायला लागली. त्यातल्या त्यात या प्रकरणातल्या आरोपींचे संशयास्पद आणि गूढ मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती सहज ४० जणांचा काटा काढणार्या असल्या पाहिजेत असे लक्षात आले आहे.