‘त्या’ कंपनीला कडेकोट पोलीस बंदोबस्त


सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणी प्रकरणी झालेली अटक आणि जामिनावर सुटका; या पार्श्वभूमीवर लोणंद येथील ज्या सोना ऍलाईज कंपनीसंदर्भात हा गुन्हा दाखल झाला आहे ती कंपनी आणि एकूण लोणंद परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोना ऍलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजेंसह १५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ९ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आले आहे. उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला आहे.

या प्रकरणामुळे लोणंद परिसरात कोणताही गैरप्रकार घडू नये; यासाठी लोणंदच्या सर्व चौकात, एमआयडीसी परिसरात आणि सोना कंपनीच्या गेटवर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोना अलॉईज कंपनी एमआयडीसीमध्ये सॅन २००९ पासून सुरु असून मातीतून कच्चे लोखंड तयार करण्याचे काम कंपनीत केले जाते.