घराण्याचे गुलाम


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रपती भवनातील ट्विटर सुरू झाले असून एकाच दिवसात नव्या राष्ट्रपतींना ३२ लाखांवर लाईक्स मिळालेल्या आहेत. राष्ट्रपतींनी केलेल्या पहिल्याच भाषणात लोकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या भाषणातील नम्रता दुसर्‍यांचे विचार जाणून घेणे हीच खरी लोकशाही हे त्यांचे म्हणणे या दोन गोष्टी भारतातल्या कोट्यवधी लोकांना भावल्या आहेत. त्यांनी आपल्या भाषणात कोणाची नावे उद्धृत केली आणि कोणाची नाहीत याचा उहापोह मात्र काही शूद्रवृत्तीच्या लोकांनी सुरू केला आहे. विशेषतः कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोविंद यांनी गांधींचे नाव घेतले परंतु पंडित नेहरु यांचे नाव घेतले नाही यावरून मोठी चीडचीड केलेली आहे. अर्थात स्वतःला गांधी-नेहरु परिवाराचे पाईक मानणार्‍या कॉंग्रेसवाल्यांकडून याशिवाय दुसरी अपेक्षा करताही येत नाही.

कॉंग्रेसच्या नेत्यांना गांधी हवे असतात पण महात्मा गांधी नव्हे. त्यांना इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हवे असतात. आपल्या देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतरची वाटचाल या सगळ्यांचा अभ्यास आणि चिंतन करत असताना कॉंग्रेसचे नेते या गोष्टी केवळ गांधी-नेहरु या एकाच परिवाराच्या भोवती करत असतात. त्यामुळे आपल्या प्रमाणेच इतरांंनीसुध्दा गांधी-नेहरु घराण्याचा जप करावा अशी त्यांची इच्छा असते. पण इतर कोणीही त्यांच्यासारखी या घराण्याला आपली निष्ठा वाहिलेली नाही. भारताच्या लोकशाही परंपरांमध्ये पंडित नेहरुंचे योगदान मोठे आहे ही गोष्ट मान्यच आहे परंतु आपले राष्ट्रपती त्यांच्याऐवजी महात्मा गांधींच्या विचाराने अधिक प्रेरित झाले असतील तर त्यांना नेहरुंचे नाव घेण्याची सक्ती करता येत नाही.

कॉंग्रेसने आजपर्यंत गांधी-नेहरुंच्या नावाचा जप करताना वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस अशा नेहरुंना तुल्यबळ असलेल्या नेत्यांकडे कायमच दुर्लक्ष केलेले आहे. कॉंग्रेसचे कित्येक नेते राष्ट्रपती झाले, पंतप्रधान झाले परंतु त्यांनी आपल्या पहिल्या भाषणामध्ये पटेल, शास्त्री, सुभाषबाबू यांच्या नावाचा चुकूनसुध्दा कधी उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी तसा तो केला नाही म्हणून अन्य कोणी तक्रार केली नाही. ज्याच्या त्याच्या श्रध्देचे विषय ठरलेले असतात आणि आपल्या मनावर ज्याचा प्रभाव असतो, ज्यांच्यामुळे आपण प्रेरित झालेलो असतो त्यांचे नाव आपल्या तोंडी येत असते. त्यावरून कोणी कोणाचा निषेध करण्यात काही अर्थ नसतो.

Leave a Comment