उपवासासाठी रोजच्या पेक्षा थोड्या वेगळ्या ५ रेसिपी


नुकताच पहिला श्रावण सोमवार म्हणून साजरा करण्यात आला. आपल्यातील काहीजण गणपतीवर फूल पडे पर्यंत श्रावण पाळतात. तर काही जण गौरीचा सण साजरा झाल्यानंतर श्रावण सोडतात. तर काही अगदी नवरात्री, दसरा होईपर्यंत शाकाहारी असतात. यांच्या जेवणात अशावेळी रंगत आणण्यासाठी मजेशीर, चटपटीत पदार्थ जेवणात असणे गरजेचे असल्यामुळे आम्ही आता यापुढे काही दिवस उपवासातील चविचे पदार्थ आणि त्यांच्या रेसिपी देणार आहोत.

१) फराळी अप्पे
यासाठी सामुग्री १/२ कप शिंगाड्याचे पीठ, १/२ कप राजगिऱ्याचे पीठ, १/४ कप भिजलेला साबुदाणा, १/४ कप भिजवलेली मोरधन, १ कप किसलेली काकडी, १ चमचा जीरा, स्वादानुसार हिरवी मिरची, २ चमचे कापलेली कोंथिबीर, १ चमचा तेल किंवा तूप आणि स्वादानुसार मिठ
कृति – ही सर्व सामग्री एकत्र करून थोडे घट्टसर पिठ मळून अप्पेला तेल किंवा तूप लावून अप्प्यांचे पिठ घालावं आणि मग ते दोन्ही बाजूने फ्राय करून गरमा गरम सर्व्ह करावे.

२) दही साबुदाणा
आज आम्ही तुम्हाला एका अशी रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे जो उपवास करत नाही तो देखील उपवास करायला लागेल. दही साबुदाणासाठी भिजलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, मीठ, मिरची, साखर, बाजारात उपलब्ध असतो तो उपास चिवडा, दही ही सामग्री लागेल.
त्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आणी तुपाची मिरची, जिरे आणी खात असाल तर कढीपत्ता टाकून मस्त फोडणी करुन वर कोथिंबीर घालून नंतर सर्व्ह करा आणि लज्जत घ्या दही साबुदाण्याची.

३) ड्रायफ्रुट्स लस्सी
साहित्य: घट्ट दही १/२ किलो, बदाम,पिस्ता, काजु, साखर १-२वाटी, मीठ, बर्फाचे तुकडे

कृती: दह्यात पाणी न घालता साखर, चिमुठभर मिठ घालुन रवीने घोटुन घ्या नसल्यास मिक्सरमध्ये घोटुन घ्या. सुरीने ड्राय फ्रुट्सचे काप करुन दह्यात मिक्स करा, मिक्सरमध्ये ड्राय फ्रुट्स वाटुन घ्यायचे असतील तर त्याची पावडर करुन मिक्स करा अन्यथा लस्सी पिताना ठसका लागतो, घट्ट लस्सीत जाड ड्रायफ्रुटस वापरा, चमच्याने खाताना समजते. पातळ लस्सीमध्ये ड्रायफ्रुटची पावडर वापरा. बर्फाचे तुकडे टाकुन सर्व करा.

४) साबुदाणा थालिपीठ
२ कप साबुदाणे पाण्यात धुवुन उरलेले पाणी काढून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत. भिजवलेले साबुदाणे,२ मोठे कुस्करलेले बटाटे,५-६ तिखट हिरव्या मिरच्यांचे व जिरे वाटण, १ कप शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ, साखर घालून नीट मिक्स करावे.
मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून थापून घ्यावे. तव्यावर तुप सोडून थालिपीठ टाकावे आणि मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे.

५) उपवासाचा डोसा – भाजी
बटाटा भाजी कृती: बटाटे व ओले शेंगदाणे शिजवून घ्यावेत. बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी कराव्यात. कढईत १ टिस्पून तूप गरम करावे. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा घालावा. यात बटाट्याच्या फोडी व शेंगदाणे घालून मध्यम आचेवर परतावे. चवीपरते मिठ आणि साखर घालावी, झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनंतर त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे.

उपवासाचे डोसा कृती: चार वाट्या वरई भगर व एक वाटी साबुदाणा धुवून वेगवेगळे भिजत ठेवावे. साधारणता दोन ते अडीच तासांनी ४-५ हिरव्या मिरची,जिर, मीठ टाकुन मिक्सरवर वाटून घ्यावे, मिश्रण करून तव्यावर तुप सोडून डोसा घाला. मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. एक बाजू शिजली की सावकाशपणे बाजू पलटावी दुसरी बाजू शिजवून घ्यावी.