या शिवमंदिरात खंडित पिंडीचीच होते पूजा


भारतीय शास्त्र पुराणात कोणत्याही देवदेवतेच्या खंडित मूर्तीची पूजा करणे निषिद्ध मानले गेले आहे. अर्थात अनेक देवालयांतून अशा खंडित मूर्ती आढळतात पण त्यांची पूजा केली जात नाही. झारखंडच्या गोइलकेरा जिल्ह्यातील बडैला येथील महादेवशाल धाम शिवमंदिराची कहाणी मात्र याच्या उलट आहे. या मंदिरातील शिवपिंडीचा अर्धा भाग तुटलेला आहे व तरीही त्या पिंडीची पूजा केली जाते व दूरदूरून भाविक या महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.


असे सांगतात की १९ व्या शतकाच्या मध्यात या गावातून बंगाल नागपूर रेल्वे तर्फे मुंबई कोलकाता रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खणताना मजुरांना जमिनीत ही पिंडी सापडली. त्यानंतर मजुरांनी काम थांबविले व पुढे काम करण्यास नकार दिला. तेव्हा तत्कालीन ब्रिटीश इंजिनिअर रॉबर्ट हेन्री याने फावड्याचा प्रहार या पिंडीवर केला तेव्हा तिचे दोन तुकडे झाले. मात्र घरी परतताना रॉबर्टचा रस्त्यातच अचानक मृत्यू झाला. परिणामी पिंडीत दिव्यशक्ती असावी असा समज होऊन या भागातून रेल्वे लाईन टाकण्यास जोरदार विरोध केला गेला.

ब्रिटीशांनी भारतीयांच्या श्रद्धेचा भाग मानून जबरदस्ती न करता रेल्वे लाईन दूरून नेली. त्यासाठी दोन बोगदे काढावे लागले. मात्र पिंड सापडलेल्या ठिकाणी देवशाल मंदिर बांधले गेले व तेथे या खंडित पिंडीची स्थापना केली गेली. या पिंडीचा दुसरा भाग येथून २ किमी दूर असलेल्या रतनबुर पर्वतावरील ग्रामदेवी पाऊडीसह स्थापन केला गेला. आजही येथे प्रथम महादेव पिंडीची व नंतर पाऊडी माँची पूजा करण्याची पद्धत पाळली जाते.

Leave a Comment