चीनी कंपनी टॉपवाईज कॅमिओ स्मार्टफोनसह भारतात


चीनमधील टॉपवाईज कम्युनिकेशन कंपनी त्यांचा ब्रँड कॅमिओ स्मार्टफोन भारतीय बाजारात पुढच्या महिन्यात घेऊन प्रवेश करत आहे. ही कंपनी भारतीय मोबाईल बाजारातील कांही टॉप प्लेअर्ससाठी फोन बनविण्याचे काम करते आता त्यांचा स्वतःचा कॅमिओ फोन ते चीन नंतर भारतीय बाजारात आणत आहेत. त्यासाठी ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या ३ वर्षात भारतीय बाजारात ५ टक्के हिस्सा मिळविण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.

कंपनीचे सीईओ संजय कलिरीना म्हणाले भारत व चीन या दोन देशातील संबंध सध्या ताणलेल्या अवस्थेत असले तरी चीनी मोबाईल कंपन्यांसाठी भारत महत्त्वाचा बाजार आहे. त्यावर चीन भारत संबंधांचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण ग्राहक हा शेवटी प्रॉडक्ट पाहात असतो. टॉपवाईज विवो व ओप्पो प्रमाणे ऑफलाईन रिटेल बाजारावर लक्ष केंद्रीत करणार आहे. ६ ते १२ हजाराच्या रेंजमधील फोन भारतीय बाजारात सादर केले जाणार असून छोट्या शहरांवर त्यासाठी लक्ष ठेवले जाणार आहे. उत्तर पश्चिम भारतापासून त्याची सुरवात केली जाईल व पुढच्या वर्षात संपूर्ण देशभर हे फोन उपलब्ध होतील. कंपनी ३ ते ४ मॉडेल्स भारतात सादर करणार असून हे सर्व अँड्रोईड फोन आहेत. सप्टेंबर पर्यंत भारतात असेंब्ली सुरू होईल व नंतर या फोनचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.

Leave a Comment