मोदी सरकार आता बंद करणार २००० रुपयांच्या नोटा?


मुंबई – बाजारात छोट्या नोटांचा पुरवठा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वाढवणार असून आता बाजारामध्ये ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा आणखीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहेत. बाजारात २०० रुपयांच्या नोटाही ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चलनात येतील. त्यासाठी स्टेट बँक देखील आपले एटीएम रिकॅलिब्रेट करत आहेत जेणेकरुन ५०० रुपयांच्या नोटांना जास्त जागा मिळेल. नवभारत टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले असून लहान नोटांची संख्या वाढवणे म्हणजेच २ हजार रुपयांची नोट बंद करण्याची प्रक्रिया असल्याची चर्चा सुरु आहे.

याबाबत वित्त मंत्रायलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटांच्या छपाई संदर्भात प्रोडक्शन प्लॅनिंगची एक बैठक ११ एप्रिल रोजी पार पडली. रिझर्व्ह बँकेने या बैठकीमध्ये २००० रुपयांच्या १०० कोटी नोटा छापण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण २००० रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाने नामंजूर केला. पण इतर लहान नोटा छापण्याच्या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली.

वित्त मंत्रालयातील सुत्रांच्या मते, लहान नोटांचा पुरवठा वाढविण्यावर सरकार भर देत असून याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे बनावट नोटा बाजारात येण्यावर लगाम लागेल आणि दुसरा फायदा म्हणजे नागरिक जास्तीत जास्त कार्ड पेमेंटकडे वळतील. मोठ्या नोटांच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठे पेमेंट करताना अडथळा येईल आणि ते ऑनलाइन व्यवहार करतील.

एटीएममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून २००० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. गेल्याकाही आठवड्यांपासून आरबीआयने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटांचा होणारा पूरवठा कमी केल्यामुळे बँकांच्या एटीएममध्ये आता २००० रुपयांच्या नोटा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यासोबतच गेल्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या नोटाबंदी प्रमाणेच आता २००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment