देशातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सुविधा देणार जिओ?


नवी दिल्ली : रिलायन्स जिओने मोफत ४जी फोन देण्याच्या घोषणा केल्यानंतर आता देशातील तीन कोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सुविधा देण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला कंपनीने यासंबंधीचा एक प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

सूत्रांनी सांगितले की, मनुष्यबळ विकास मंत्रालय या प्रस्तावावर विचार करीत असून याबाबतचा अंतिम निर्णय अजून बाकी आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पारदर्शक निविदा प्रक्रियेतून जाईल. याबाबत प्राप्त माहितीनुसार, गेल्या महिन्यात रिलायन्स जिओकडून मंत्रालयाला यासंबंधीचा प्रस्ताव मिळाला. देशातील ३८ हजार महाविद्यालयांना (तंत्रज्ञान आणि बिगर तंत्रज्ञान) मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी देण्याची इच्छा त्यात कंपनीने दाखविली आहे. अशा प्रकारे महाविद्यालयांना मोफत वाय-फाय सुविधा मिळाल्यास महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट वापरता येईल. त्याद्वारे स्वयमच्या व्यासपीठावरून नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक स्रोत आणि ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पैसे न खर्च करता वापरता येतील.

Leave a Comment