पुन्हा एकदा बोफोर्स


१९८५ साली पंतप्रधान झालेले राजीव गांधी देशात विलक्षण लोकप्रिय होते आणि स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान म्हणून त्यांनी आपली प्रतिमा समाजात ठसवलीसुध्दा होती. परंतु त्यांच्याच मंत्रिमडळातील अर्थमंत्री विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरण उचलून धरले आणि त्यामुळे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला. १९८५ साली लोकसभेच्या ४११ जागा जिंकणार्‍या राजीव गांधींना बोफोर्सच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत २०० सुध्दा जागा जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीनंतर दोन वर्षांनी राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. परंतु त्यानंतरही बोफोर्स प्रकरण अधूनमधून उद्भवतच गेले.

या प्रकरणाचा गौप्यस्फोट करण्यामागे चेन्नईच्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी मोठी धाडसी कामगिरी केली होती. परंतु हे प्रकरण आता दबले आहे असे वातावरण तयार झाले. आता मात्र जवळपास १० वर्षांनी पुन्हा एकदा या प्रकरणाने बातमीची जागा घ्यायला सुरूवात केली आहे. बोफोर्स प्रकरणात भारत सरकारने संसदीय समिती नेमून चौकशी केली. पण तिच्या हाती फारसे काही लागले नाही. सीबीआयने खटला भरला. त्याही खटल्यात राजीव गांधी निर्दोष सुटले. त्यामुळे सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे नेते बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींवर अन्याय झाला असे म्हणत असतात. दिल्ली उच्च न्यायालयानेही बोफोर्सच्या लाच प्रकरणात राजीव गांधींना लाच मिळाली नाही असा निर्वाळा दिला होता. कॉंग्रेसचे नेते त्याचाच आधार घेतात.

आता चित्रा सुब्रमण्यम यांनी या प्रकरणातील स्वीडिश सरकारचे तपासाधिकारी स्टेन लिंडस्टॉर्म यांची दूरचित्रवाणीवर एक मुलाखत घेतली आहे. तिच्यात लिंडस्टॉर्म यांनी कॉंग्रेसला खुलासे करायला अवघड जाईल असा एक प्रश्‍न उपस्थित केला आहे. बोफोर्स प्रकरणात एवढ्या चौकशा आणि एवढे खटले झाले परंतु भारत सरकारने, कॉंग्रेस पक्षाने, भारतीय संसदेच्या चौकशी समितीने किंवा गांधी परिवाराने स्वीडिश सरकारच्या आपल्या चौकशी समितीकडे एकदाही कसलीही विचारणा का केली नाही असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. बोफोर्सच्या प्रकरणात या कंपनीचे वकील म्हणवणारे ऍड. आर्ब्दो यांना या प्रकरणाची खरी माहिती होती असे म्हटले जाते. ते आर्ब्दो आता मरण पावले आहेत. त्यांचे निधन झाले तेव्हा आर्ब्दो यांच्या बरोबरच बोर्फोर्स प्रकरणाचे सत्यही दफनले गेले आहे, असे म्हटले जात होते. पण आता ते रहस्य जाणणारा एक माणूस हयात आहे आणि या ७१ वर्षाच्या माणसाने कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.

Leave a Comment