बीटी बियाणांचा वाद


आपला देश नेमका मागे का पडतो याची नेमकी मीमांसा फार कमी वेळा केली जाते. या संबंधात होणार्‍या चर्चा फार वरवरच्या आणि अतार्किक असतात. त्यांचे नेमके निष्कर्षसुध्दा कधी समोर येत नाहीत आणि त्यातून काही निष्पन्नही होत नाही. परंतु काही वेळा काही गोष्टी फार नेमकेपणाने आपल्यासमोर येऊन उभ्या राहतात आणि आपणच आपल्या देशाचा घात कसा करत असतो याचे नेमके चित्र उभे राहत असते. आपल्या देशातली शेती मागासलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या वर्गात सध्या आत्महत्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. याचेही नेमके कारण कधी समोर येत नाही. विनाकारण वाद मात्र होत राहतात. परंतु काही वेळा शास्त्रज्ञ मंडळी नेमका निर्देश करत असतात. त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

आपल्या देशात जनुकीय बदल केलेले बियाणे वापरावे की नाही यावर वाद जारी आहे. सारे जग अशा प्रकारचे बियाणे वापरून स्वावलंबी होत आहे आणि आपापल्या देशातील अन्नधान्याचा तुटवडा दूर करत आहेत. ज्या देशांकडून हे बियाणे वापरले जाते त्या देशामध्ये त्याचे कसलेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. परंतु भारतातल्या काही सनातनी लोकांनी या बियाणांच्या विरोधामध्ये निष्कारण आडकाठी आणायला सुरूवात केली आहे. तशी ती असतानासुध्दा देशात कापसाचे जनुकीय बदल केलेले बियाणे वापरले गेले आणि गेल्या दहा वर्षांमध्ये कापसाचे पीक बोंड अळीच्या संकटापासून मुक्त झाले. शिवाय देशामध्ये कापसाच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या नफ्यातही वाढ झाली.

असे उदाहरण समोर असतानाही देशात जनुकीय बदल केलेल्या वांग्याच्या बियाणांना कायदेशीर हरकती घेतल्या गेल्या. या बियाणांच्या वापराचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख डॉ. बी. शशिकरण यांनी वांग्याच्या बियांना अनुमती नाकारली गेल्यामुळे आपले फार मोठे नुकसान झाले असे खेदाने नमूद केले. भारतात तयार झालेले अशा प्रकारे वांग्याचे बी बांगलादेशात मात्र सर्रास वापरले जात आहे. तिथे ६ हजार शेतकरी या बियांची शेती करत आहेत आणि ही वांगी खाऊन एकही जण मरण पावल्याचे दिसलेले नाही. आपण मात्र अज्ञानातून या बियाणांना विरोध करत आहोत. आता सध्या शास्त्रज्ञांनी जनुकीय बदल केलेले मोहरीचे बी शोधून काढले आहे. त्यालाही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांचा विरोध आहे आणि त्यामुळे आपण दरवर्षी ८० हजार कोटी रुपयांचे गोडे तेल परदेशातून आयात करणे पसंत करत आहोत. आपण स्वतःचा घात कसा करून घेतो याचे हे उदाहरण.

Leave a Comment