राष्ट्रीय पक्षी मोरासंबंधी कांही


आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड केली गेली आहे. मोराला हा बहुमान २६ जानेवारी १९६३ साली दिला गेला. अर्थात तमीळनाडूतील उटकमंड येथे नॅशनल बर्ड सिलेक्शन मंडळाच्या १९६० साली झालेल्या बैठकीत हंस, सारस, ब्राह्मणी बदक या पक्षांच्या नावाचाही विचार झाला होता मात्र अखेर बाजी मारली मोराने. ही निवड करताना देशाच्या प्रत्येक भागात सापडणारा, नागरिकांना माहिती असलेला तसेच भारतीय संस्कृतीचा हिस्सा असलेला पक्षी निवडण्यास प्राधान्य होते व त्यात मोर यशस्वी झाला. भारताप्रमाणेच शेजारी म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी मोरच आहे.

मोराचा विणीचा हंगाम साधारण जानेवारी ते आक्टोबर असा असतो. लांडोर एकावेळी ३ ते ५ अंडी घालते. मोर केकारव करून लांडोरीना आकर्षिक करतात त्यासाठी पिसारा फुलवून नृत्यही करतात. मोर हे सुंदरता व सभ्यतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्या पंखांचा वापर मुकुट, सिंहासने, शाईने मजकूर लिहिण्यासाठी असा अनेक प्रकारे होतोच पण हिंदू देवता श्रीकृष्णाच्या डोक्यावरही मोरपीस विराजमान आहे. गणेशाचा भाऊ कार्तिकेयाचे मोर हे वाहन आहे. मोर हा मुळचा भारतीयच आहे.


अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशी नेले व त्यानंतर विविध देशात मोराच्या विविध प्रजाती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मोर हा बहुभक्षी आहे म्हणजे तो साप, पाली किडे खातो तसेच धान्यही खातो. खुली मैदाने, दर्‍याखोर्‍यात ते राहतात. मोर उडतात कमी व रात्री झाडांवरच झोपतात. जंगलातील मोर सिंह अथवा अन्य प्राणी शिकारीसाठी बाहेर पडले तर जोरजोरात ओरडून अन्य प्राण्यांना सुचना देतात. मोराचा नाच हा नयनमनोहर सोहळा असतो. विशेषतः पावसाळ्यात या नाचाला बहर येतो. मोराच्या शिकारीवर भारतात बंदी आहे.

मोराचे संदर्भ प्राचीन काळापासून सापडतात. सम्राट अशोक, मौर्य राजांच्या नाण्यांवर मोर कोरलेले आढळातात. शहाजहान मयुर सिंहासनावर बसत असे त्याला तख्त एक ताऊस असे नांव होते. ताऊस या अरबी शब्दाचा अर्थ आहे मोर.

Leave a Comment