कपालेश्वर शिवमंदिरात नाही नंदी


श्रावण महिन्याची सुरवात झाली आहे. देशभरातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी आता होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या नाशिक मध्ये असलेले कपालेश्वर महादेव मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे शिवासमोर त्याचे वाहन नंदी नाही. गोदावरी काठी असलेल्या या मंदिरात भाविकांची वर्षभर गर्दी असते. १२ ज्योतिर्लिंगांनंतर हे देवालय सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्राचीन काळी टेकडीवर शिवपिंड होती आता येथे प्रचंड मोठे मंदिर असून तेही प्राचीन आहे. त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला होता असे संदर्भ सापडतात.


या मंदिरामागे एक सुरेख कथा आहे. असे सांगतात इंद्रसभेत ब्रह्मदेव व भोलेनाथ शंकर यांच्यात वाद झाला. ब्रह्मदेवाला पाच तोंडे होती त्यातील चार वेदोच्चारण करत असत तर पाचवे निंदा करत असे. या मुखाने शिवाची निंदा आरंभल्यानंतर शिवाला क्रोध आला व त्याने हे मुख कापून टाकले. यामुळे शिवाला ब्रह्महत्येचे पाप लागले. त्यातून मुक्तीसाठी ब्रह्मांडात फिरत असताना शिवाला एक गाय वासरू दिसले. ज्या घरात हे गायवासरू होते तेथील ब्राह्मण वासराच्या नाकात वेसण घालत होता. वासराने या ब्राह्मणाला शिंग मारले त्यात ब्राहमण मरण पावला. वासरालाही ब्रह्महत्येचे पातक लागले व त्याचे शरीर काळे पडले. वासराने गायीसह जाऊन रामकुंडात स्नान केल्यावर त्याला पापातून मुक्ती मिळाली. शिवाने हे सारे पाहिले व त्यानेही रामकुंडात स्नान करून पापमुक्ती मिळविली. हे ज्ञान त्याला वासराकडून मिळाल्याने त्याने त्याला गुरू मानले. हाच नंदी. त्यानंतर शिवाने नंदीला माझ्या समोर तुम्ही बसू नका अशी विनंती केल्याने या मंदिरात शिवासमोर नंदी नाही.

गोदावरीच्या एका काठाला हे मंदिर आहे तर दुसर्‍या काठावर सुंदरनारायण मंदिर आहे. जवळच रामकुंड असून रामाने याच कुंडात दशरथाचे श्राद्धविधी केले होते असे सांगतात. वर्षातून एकदा येथे हरिहर भेटीचा सोहळा होतो. म्हणजे कपालेश्वर व सुंदर नारायण यांचे मुखवटे गोदावरी काठी आणून तेथे त्यांची भेट घडविली जाते व नंतर त्यांना अभिषेक केला जातो.

Leave a Comment