खुज्या नेत्यांचा गलबला


सध्या आपल्या लोकशाहीला खुज्या नेत्यांनी गराडा घातला आहे आणि ते आपल्याला भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ समजून नको तसे बोलून आपली शोभाही करून घेत आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्याला कसल्या तत्त्वज्ञानाचा आधार नाही आणि तारतम्याचीही बैठक नाही. राहुल गांधी तर बोलून चालून पप्पुच. त्यांच्या बोलण्याला फार वैचारिक उंची असावी अशी मुळात अपेक्षाच नाही. पण ते तत्त्वज्ञाचा आव आणून मोदी सरकारला उपदेशाचे डोस पाजत आहेत. विरोधकांनी सरकारच्या कामाचे मूल्यमापन करून सरकारचे डोके नेहमी ठिकाणावर राहील याची काळजी केलीच पाहिजे पण विरोधकांनी सरकारची चूक दाखवताना ती सकारण आणि सप्रमाण दाखवली पाहिजे. एक दिवस उठायचे आणि कोठे तरी लोकांना गोळा करून शेतकरी मेळावा घेण्याच्या बहाण्याने सरकारवर आगपाखड करायच हा काही विरोधकांच्या कर्तव्याचा भाग नाही. पण राहुल गांधी यांनी तसा सपाटा लावला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका करणारे भाषण केले होते तोही असाच प्रकार होता.

सोनिया गांधी यांनी म्हटले होते. वाजपेयी सरकार हे अकार्यक्षम, भ्रष्ट, निकामी, लोकशाही विरोधी, घटनेची पायमल्ली करणारे, विरोधकांची गळचेपी करणारे आहे. त्यावर वाजपेयी यांनी या आरोपाचा समाचार घेताना सोनिया गांधी यांना सवाल केला होता. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करायची असते म्हणजे असे शब्दकोशातले शब्द एकापुढे एक ठेवून सरकारवर आरोप करायचा नसतो. यातल्या प्रत्येक आरोपाला आपल्याकडे पुरावा हवा. सरकार अकार्यक्षम आहे म्हणजे काय ? ही अकार्यक्षमता कोठे दिसली? भ्रष्ट आहे तर कोणी भ्रष्टाचार केला आणि त्याचे पुरावे कोणते ? लोकशाही विरोधी म्हणजे काय ? सरकारने कोणते कृत्य लोकशाहीला सोडून केले आहे? पण असे कशाचेेही दाखले न देता आरोप करण्याला अफाट आरोप असे म्हणतात. तसे आरोप करणार्‍या विरोधी पक्षाला बेजबाबदार विरोधक असे म्हणत असतात. आताही राहुल गांधी यांनी असाच शब्दकोश समोर ठेवून मोदी सरकारला झोडपायला सुरूवात केली आहे. आपण मोदींचे नाव घेऊन अशी टीका केली की लोकांचा आपल्याला पाठींबा मिळेल आणि आपले नेतृत्व हे आक्रमक समजले जाईल असा त्यांचा काहीसा तर्क आहे. पण त्या पायी सरकारला ते घटनाविरोधी, महागाईस कारणीभूत, अकार्यक्षम आणि निष्क्रिय ठरावायला निघाले आहेत. पुरावा म्हणाल तर एकाही आरोपाचा देत नाहीत.

आता त्यांनी मोदींना हिटलर ठरवले आहे. हुकूमशाही प्रवृतीचा त्यांच्यावर आरोप केला आहे. खरे तर या देशात हिटलर कसा होता हे कोणालाही माहीत नाही. पण त्याची जी काही वर्णने साहित्यातून आली आहेत. त्यानुसार या देशात त्याच्याशी बरोबरी करणारे एकच नेतृत्व होते व ते होते राहुल गांधी यांच्या आजीचे. त्या आपल्या मनाला येईल तसे मुख्यमंत्री बदलत असत. सरकार आणि मंत्रिमंडळ यांचे निर्णय त्या बदलत असत आणि त्यासाठी त्यांच्या कानी लागलेल्या लोकांचे एक किचन कॅबिनेट असे. मंत्र्यांच्या निर्णयांना केराची टोपली दाखवून या किचन कॅबिनेटचे निर्णय अंमलात येत असत. मोदी यांनी असे काही केले आहे का ? इंदिरा गांधी यांनी देशात १८ हजार विरोधी कार्यकत्यार्ंंना कसलीही पूर्वसूचना न देता आणि न्यायालया समोर उभे न करता तुरुंगात टाकले होते. मोदी यांनी असे कोणाला अटक केले आहे का ? आणीबाणीत प्रत्येक दैनिकाच्या कार्यालयात एक पोलीस उपनिरीक्षक बसलेला असे आणि तो त्या दैनिकात छापावयाचा मजकूर तपासून त्यावर स्वाक्षरी करीत असे. तेव्हाच ते दैनिक छापले जात असे. असा प्रकार आता होत आहे का ?

राहुल गांधी यांनी मोदींवर हिटलर असल्याचा आरोप करताना असा काही तरी पुरावा दिला पाहिजे. तसा तो न देता ते सरसकट आरोप करणार असतील तर ते विरोधी पक्ष म्हणून आपल्या कर्तव्यात चुकत आहेत असे म्हणावे लागेल. अर्थात राहुल गांधी यांना त्याची पर्वा नाही कारण त्यांना मोदींच्या विरोधात खरी खोटी जशी असेल तशी मोहीम चालवून आपल्या हातात सत्ता घ्यायची आहे. माणूस असा खोटारडेपणा करतो तेव्हा त्याची नियत चांगली नसते. ते त्यांना कळत नसले तरीही लोकांना नीट कळते आणि म्हणूनच राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे अध:पतन होत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या असोत की गरिबी असो या निमित्ताने सरकारवर टीका करताना ते आपल्या पक्षाच्या हातात दहा वर्षे कारभार होता तेव्हाच हे आत्महत्यांचे सत्र सुरू झाले होते हे आठवायलाच तयार नाहीत. त्यांना ते आठवत नसले तरीही जनतेला ते आठवते आणि म्हणूनच कॉंग्रेस पक्षाला वरचेवर जनतेची नाराजी स्वीकारावी लागत आहे. अर्थात त्यांच्या निमित्ताने आपली लोकशाही किती खुज्या नेत्यांच्या खांद्यावर उभी आहे याचे विदारक दर्शन आपल्याला होत आहे. त्यांच्या वागण्या बोलण्याला ना ताळ ना तंत्र. विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा तर आधारही नाही आणि गंधही नाही. जीभ उचलायची आणि टाळ्याला लावायची. टाळ्या मिळाल्या की खुष. मग लोकांतल्या आपल्या विश्‍वासार्हतेचे काही का होईना.

Leave a Comment