विमानतळ ? नव्हे – हा तर स्मशानघाट


स्मशानघाटावर जाण्याची पाळी आपल्यावर येऊ नये असे कुणालाही वाटते. कारण याचा थेट संबंध आपले जिवलग, मित्र, नातेवाईक यांच्या वियोगाशी असतो. अनेकांना स्मशान भीतीदायकही वाटते. स्मशानाची ही भीती दूर व्हावी यासाठी गुजराथेतील सोमाभाई पटेल यांनी बारडोली येथे आगळेवेगळे स्मशान तयार केले आहे. अंतिम उड्डाण मोक्ष यात्रा असे त्याला संबोधले जाते. देशातील हे एकमेव असे स्मशान आहे जेथे विमानांच्या मोठ्या प्रतिकृती उभारल्या गेल्या आहेत. येथे मोक्ष एअरलाईन्स व स्वर्ग एअरलाईन्स या नावाने ही विमाने आहेत.

येथे शवावर अंतिम संस्कार करताना विमानतळाप्रमाणेच अनाऊन्समेंट केली जाते. कुठून प्रवेश करा, हे सांगताना नातेवाईकांना सांत्वनपर गोष्टी ऐकविल्या जातात. प्रवेशापासून ते थेट अंत्यसंस्काराच्या भट्टीपर्यंत विमानतळाप्रमाणेच सर्व वातावरण आहे. येथे ५ चितास्थळे आहेत व त्यातील तीन इलेक्ट्रीक आहेत. शवावर अग्नीसंस्कार होताना विमान सुरू झाल्यासारखा आवाज येतो. येथे कायमस्वरूपी मोक्ष विमानतळ उभारण्याचे प्रयत्न सुरू असून आसपासच्या ४० गावातील लोक येथे अंत्यसंस्कारासाठी येतात.

Leave a Comment