या देशांतही बनतात बर्फानी बाबांसारख्या आकृती


देशात सध्या अमरनाथ यात्रा सुरू असून तमाम अडचणींना पार करत लाखो भक्तगण बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी खडतर वाटचाल करत आहेत. राखी पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या या यात्रेला दहशतवादी हल्लयांचे गालबोट लागले आहे मात्र भाविकांची भक्ती तसूभरही कमी झालेली नाही. अर्थात अशी बर्फाची शिवलिंग अथवा तशा आकृती आढळणारे अमरनाथ हे एकमेव स्थळ नाही. जगाच्या पाठीवर अनेक देशांत गुहांतून काही काळ शिवलिगांसारख्या आकृती बनतात व त्या पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात.


ऑस्ट्रीयातील आईसरिजन बेल्ट मध्ये जगातील सर्वात मोठी बर्फाची गुहा आहे व येथेही शिवलिंगाप्रमाणे प्रचंड मोठी आकृती तयार होते. मे महिन्यात हे लिंग बनायला सुरवात होते व आक्टोबरपर्यंत ते पाहता येते. येथे शिवलिंगाच्या कडेने आणखीही छोट्या छोट्या आकृत्या तयार होतात.


स्लोव्हाकियातील दोबसिना प्रदेशातील दोबसिस्का हा भाग युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. येथेही बर्फाची २६.५ मीटर इतकी प्रचंड आकाराची शिवलिंगाप्रमाणे दिसणारी आकृती तयार होते. या जागेचा शोध खाण अभियंते सफोनी याने १८७० साली लावला होता. या गुहेला वीजपुरवठाही केला गेला आहे.


स्वित्झर्लंडमधील मिटत्तेलाटिन येथेही हाच चमत्कार पाहता येतो. हा भाग फेअरी ग्लेशियर म्हणूनही ओळखला जातो.७० फूटी बोगद्यातून येथे जाता येते. येथेही शिवलिंगाप्रमाणे बर्फांच्या आकृती बनतात. येथे रंगीबेरंगी दिव्यांची सजावटही असते व त्या प्रकाशात या आकृती आणखीनच वेगळ्या उठून दिसतात. अलास्कातील मेंडेनहॉल येथील हवेत कधीच बदल होत नाही. त्यामुळे वर्षभर येथे शिवलिगांसारख्या बनलेल्या बर्फांच्या आकृत्या पाहता येतात. या आकृत्या बनण्यामागे जागतिक तापमानवाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment