नासाच्या नकाशात भारत उजळ, चीनचा जळफळाट!


अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने अंतराळातून घेतलेली पृथ्वीची रात्रीची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. यात चीनपेक्षा भारत अधिक उजळ दिसतो. चीनचा मात्र यामुळे जळफळाट झाला असून हा नकाशा खरा नाही, असा कांगावा चिनी माध्यमांनी सुरू केला आहे.

गेले काही दिवस चीन आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. भूतानमधील डोकलाम मुद्द्यावरून दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. अशा वेळेस नासाने ‘अर्थ सिटी लाईट्स प्रोजेक्ट’नावाच्या प्रकल्पांतर्गत हा नकाशा दाखवला आहे. यात रात्री घेतलेल्या छायाचित्रात भारतात चीनपेक्षा अधिक प्रकाश दिसतो. प्रत्येक देशातील विजेची उपलब्धता दाखविण्यासाठी हा नकाशा तयार करण्यात आला आहे. मात्र यामुळे चिनी माध्यमांमध्ये जळफळाट सुरू झाला आहे.

“हा नकाशा खरा नाही, कारण यात भारत रात्री चीनपेक्षा अधिक उजळ दिसतो. खरे तर चीनमध्ये जास्त वीज आहे त्यामुळे तेथे अधिक उजेड दिसायला पाहिजे,” असे ‘पीपल्स डेली’ या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे. भारत हा तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे तो अधिक उजळ दिसतो, अशी मखलाशीही ‘पीपल्स डेली’ने केली आहे. त्यासाठी चीनमधील विजेच्या उत्पादनाची आकडेवारीही दिली आहे.

Leave a Comment