ऑडीने जगभरातून परत मागवल्या ८.५ लाख डिझेल कार


मुंबई : वाहन उद्योगातील अग्रणी असलेल्या जर्मनीच्या ऑडी कंपनीने अमेरिका आणि कॅनडा वगळता जगभरातील सुमारे ८.५ लाख कार परत मागवल्या आहेत. या गाड्या काही तांत्रिक अडचणीमुळे परत मागविल्याचे बोलले जात आहे. पण यामुळे ऑडीप्रेमींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑडी कंपनीने परत मागविलेल्या या डिझेल कार ६ आणि ८ सिलिंडर असलेल्या आहेत. या कारमधील तांत्रिक बिघाडामुळे परत मागवल्याचे कंपनीने म्हटले आहे. ऑडीने शुक्रवारी जर्मनीच्या फेडरल मोटार ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचा सल्ला घेऊन गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला. ऑडीच्या मते, या कार्यक्रमातंर्गत शहरी भागाकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

डिझेल वाहनातून होणाऱ्या उत्सर्ग चाचण्यांना चकवण्यासाठी अवैध सॉफ्टवेअरचा उपयोग केल्याचा आरोप ऑडी कंपनीवर आहे. डिझेल एमिनशन स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर फॉक्सवॅगनची सहायक कंपनी असलेल्या ऑडीने इयू५ आणि इयू६ डिझेल इंजिन असलेल्या कारसाठी रेट्रोफिट कार्यक्रम सुरू केला आहे. अशा पद्धतीचे इंजिन असलेल्या पोर्श आणि फॉक्सवॅगन कारचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून या अंतर्गत मोफत सर्व्हिसिंग करून देण्यात येणार आहे.

या अडचणीचा सामना करणाऱ्या जर्मनीची आणखी एक कार निर्माती कंपनी एजीनेही मंगळवारी आपल्या कार परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. एजीने संपूर्ण यूरोपमधून मर्सिडीज बेंज ब्रँडच्या ३० लाख कार परत मागवण्याची घोषणा केली होती. डिझेल कारसाठी कंपनीने आखलेल्या या व्यापक कार्यक्रमासाठी सुमारे १६.५ अब्ज रूपये खर्च होणार असल्याचे बोलले जाते.

Leave a Comment