वाघेला यांचे बंड


गुजरात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कॉंग्रेसच्या नेत्यांशी वाद जारी होते. त्यांनी पक्षाने बोलावलेल्या काही बैठकांना अनुपस्थिती लावली त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात नाराजी होती. या दोघांत जो संघर्ष जारी होता त्यामुळे आधी पक्ष त्यांना काढणार की ते पक्षाला आधी सोडणार असा प्रश्‍न होता. पण पक्षाने त्यांना काढून टाकले आणि नंतर २४ तासांनी त्यांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. ते नंंतरच पक्षाचा त्याग करणार असा अंदाज होता कारण ते तशी घोषणा त्यांच्या वाढदिवसाच्या सत्कार समारंभात करणार असे वाटत होतेच. म्हणून पक्षाने त्यांना आधी काढले आणि त्यांच्या डावपेचावर मात केली.

कोणी काय केले यापेक्षा आता वाघेला पक्षात नाहीत हे महत्त्वाचे आहे कारण गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. गेली २५ वर्षे गुजरातेत कॉंग्रेसला सत्ता मिळालेली नाही. नरेन्द्र मोदी यांनी कॉंग्रेसला डोके वर काढू दिलेले नाहीच पण मोदी पंतप्रधान होण्याच्या सात वर्षे आधीही कॉंग्रेसला तिथे सत्ता गमवावी लागली होती. एवढा दीर्घ काळ अनेक लाटा आल्या आणि गेल्या पण कॉंग्रेसला तिथे सत्ता मिळवता आली नाही. आताही पक्ष पराभवाच्याच छायेत आहे कारण पक्षात एकदिलाने काम करणारे कोणी नाहीत. शंकरसिंग वाघेला हे गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी मागणी करीत होते.

पक्षाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली त्यामुळे ते नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताना आपल्या रक्तातच बंडखोरी असल्याचे म्हटले आहे. ते मुळात भाजपात होते पण तिथे त्यांची डाळ शिजेना म्हणून त्यांनी काही आमदार सोबत घेऊन कॉंग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली होती. ते आता बंड करून कॉंग्रेसच्या बाहेर पडले आहेत पण ते आता भाजपात जाणार नाहीत. त्यांना आता एकतर आपल्या राजकीय वाटचालीला विराम द्यावा लागेल. त्यांचे हे बंड कॉंग्रेसला मात्र महागात पडणार आहे कारण वाघेला यांचे पाठीराखेही कॉंग्रेसपासून दूर जाणार आहेत. कालच राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसला धक्का बसला आहे. राज्यात कॉंग्रेसचे ५७ आमदार असताना मीराकुमार यांना केवळ ४९ मते मिळाली आहेत. आठ कॉंग्रेस आमदारांनी कोविंद यांना मतदान करून बंड पुकारले आहे. त्यातच आता वाघेलाही बाहेर पडले आहेत.

Leave a Comment