येथे कन्या अशोकसुंदरीसह विराजमान आहेत महादेव


श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र महिना. देशभरात ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येने असलेल्या शिवमंदिरात भाविक या महिन्यात गर्दी करतील. शिवासोबत पार्वती व पुत्र गणेश, कार्तिकेय असलेली अनेक मंदिरे देशात आहेत. मात्र राजस्थानातील कोटाजवळ असलेले कर्णेश्वर किंवा कंसुआ शिवमंदिर देशातील एकमेव वेगळे मंदिर आहे. या मंदिरात महादेवासोबत पार्वती, गंगा, गणेश, कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेतच पण शिवकन्या अशोकसुंदरी हिची मूर्तीही या परिवारासोबत विराजमान आहे.


कोटा नगरीचे महर्षी विश्वामित्र व इंद्राची अप्सरा मेनका यांच्याशीही नाते आहे. विश्वामित्र व मेनका यांची मुलगी शकुंतला हिचे पालनपोषण ज्या कण्व ऋषींनी केले ते याच ठिकाणी. येथेच तिची राजा दुष्यंताबरोबर गाठ पडली व तिच्या भरत मुलावरूनच देशाला भारत नांव पडले हा इतिहास आहे. कण्व ऋषी शंकराचे परमभक्त होते व त्यांनी आर्यावर्तात चार जागी आश्रम स्थापून शिवमंदिरे उभारली. त्यातील एक कंसुआ गावात असून येथे त्यांनी महादेवाची त्याच्या सर्व परिवारासह प्राणप्रतिष्ठा केल्याचे सांगितले जाते.


कण्वांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या महादेवाने त्यांना वरदान दिले की जो कोणी येथे येऊन त्याच्या मनातील इच्छा नुसती बोलून दाखवेल त्याची इच्छा त्वरीत पूर्ण होईल. कर्णेश्वर धाम या नावाने हे मंदिर ओळखले जाते. येथे शिव परिवाराबरोबरच नंदी, भैरव, शिवगणही स्थापित आहेत. मौर्य शासकाची या महादेवावर खूप श्रद्धा होती व राजा धवल याने ७६८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे दिसतो. या मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन सुरू असताना १-१ महिना त्याची किरणे थेट महादेवाच्या चरणांवर पडतात. येथील जलकुंडात पवित्र स्नान केले जाते तसेच मंदिर प्रांगणात पंचमुखी महादेवही पाहायला मिळतो.

Leave a Comment