आता उत्तर प्रदेशात महागठबंधन


मोदी यांचा प्रभाव आणि भाजपाचे वर्चस्व यांना शह देण्यास असमर्थ ठरलेल्या विरोधी पक्षांना आता महागठबंधन हाच एक दिलासा देणारा पर्याय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी एकाही निवडणुकीत असा शह देण्यात त्यांना यश आले नाही पण बिहारमध्ये महागठबंधन करण्यात आले आणि भाजपाला पराभूत करता येते असा विश्‍वास मोदी विरोधकांत वाढायला लागला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी तिथे बिहारप्रमाणेच महागठबंधन करून मोदी यांना पराभूत करून चांगलाच शह द्यावा या दिशेने कॉंग्रेसने प्रयत्न करून पाहिला पण मायावती काही समाजवादी पार्टीसोबत येण्यास तयार झाल्या नाहीत. शिवाय एका बाजूला महागठबंधन तयार करण्याचे प्रयत्न जारी असले तरीही मायावती आणि अखिलेश यादव यांना आपण महागठबंधन न करता एकट्यानेच बहुमत मिळवू शकू असा विश्‍वास वाटायला लागला होता. मात्र त्यांचा गर्वाचा तोरा उतरला आणि विधानसभा निवणुकीत या दोन्ही पक्षांची धोबीपछाड झाली.

आता मात्र सगळ्याच विरोधी पक्षांना देव आठवायला लागले आहेत. उत्तर प्रदेशात महागठबंधन करावे असा प्रस्ताव तिथे चर्चेला आला आहे आणि त्याला मायावती, अखिलेश आणि राहुल गांधी या तिघांनीही दुजोरा दिला आहे. असे महागठबंधन तयार होऊ शकते की नाही आणि झाले तरीही त्याचा किती प्रभाव पडेल याचा अंदाज येत नाही पण तो पडताळून पाहण्याची संधी येत आहे. तिथे आता येत्या काही दिवसांत लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या पाच मतदारसंघात पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या सात मतदारसंघात हे महागठबंधन किती प्रभावी ठरेल याचा नेमका अंदाज येईल. तशी चर्चाही सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपापले लोकसभा मतदारसंघ सोडल्यानंतर फुलपूर आणि गोरखपूर या दोन मतदारसंघात पोट निवडणुका घ्याव्या लागतील. या निवडणुका लढवताना सपा, बसपा आणि कॉंग्रेस यांचे महागठबंधन करावे अशी तयारी सुरू झाली आहे. आता राज्यसभेचा राजीनामा दिल्यामुळे कोणत्याही सभागृहात नसलेल्या मायावती यांनी या महागठबंधनांचे उमेदवार म्हणून फुलपूरमधून उभे रहावे असा प्रस्ताव समोर आला आहे. एरवी मायावती या समाजवादी पार्टीच्या वार्‍यालाही उभ्या राहण्यास तयार नसतात पण आता त्यांच्या अस्तित्वाचा आणि दलित मतदारांच्या पाठींब्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने त्या तयार झाल्या आहेत.

गोरखनाथ मतदारसंघातही महागठबंधनाचा उमेदवार म्हणून समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने उभे रहावे अशी कल्पना पुढे आली आहे. पाच विधानसभा मतदारसंघातही अशाच रितीने महागठबंधन करावे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या डावपेचांचा प्रयोग करावा अशी चर्चा सुरू आहे. देशात एका विशिष्ट राजकीय स्थितीतून वाट काढून नवा राजकीय प्रवाह वाहता करायचा असेल तर त्याचे असे प्रयोग पोटनिवडणुकीतच झाले आहेत. या दृष्टीने उत्तर प्रदेशातल्या या प्रयोगाकडे लोकांचे लक्ष लागून राहणार आहे. अर्थात या पोटनिवडणुकांना या महागठबंधनाशिवाय इतरही काही आयाम असणार आहेत. फुलपूर हा तसा पंडित नेहरू यांचा मतदारसंघ आहे आणि तिथे आता हे महागठबंधन ज्या मतदारांवर लक्ष केन्द्रित करणार आहेत त्या दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आणि मायावती यांच्या उमदेवारीमुळे या महागठबंधनाला विजयाची जास्त संधी आहे. पण भाजपाने आता दलित समाजाला राष्ट्रपतीपदाची संधी दिल्यामुळे सारेच हिशेेब महागठबंधनाला अनुकूल असतील याची काही शाश्‍वती देता येत नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील या दोन मतदारसंघांची आकडेवारी उपलब्ध आहे. तिच्यानुसार त्यांत भाजपाला मिळालेली मते मोठी आहेत. सपा, बसपा आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांना मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा भाजपाला मिळालेली मते जास्त आहेत. तेव्हा महागठबंधन ही तीन पक्षांची बेरीच तिथे फार उपयुक्त ठरेल असे वाटत नाही. भाजपाला पराभवाची चव चाखायला लागेल असे काही वातावरण तयार करावे लागणार आहे. भाजपाच्या हाती सत्ता आल्यापासून कथित गो रक्षकांकडून दलित आणि मुस्लिमांच्या हत्या होत आहेत असा अतिशयोक्त प्रचार करून भाजपाला बदनाम करण्याचा आणि या दोन समाजघटकातला भाजपाचा पाठींबा कमी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे पण, या प्रचाराचा उपयोग होतो की नाही आणि झाला तरीही किती होतो याचीही परीक्षा या दोन मतदारसंघातल्या पोटनिवडणुकांत होणार आहे. उत्तर प्रदेशात महागठबंधन करण्याची कल्पना बिहारवरून सुचली आहे पण मुळात बिहारातलेच हे महागठबंधन निर्माण झाल्यापासून दोनच वर्षात मोडकळीला आले आहे. तेच आता टिकते की नाही या बाबत शंका व्यक्त व्हायला लागली आहे. तेव्हा उत्तर प्रदेशातल्या या प्रयोगाला मानसिक बळ देण्याची क्षमता बिहारातल्या महागठबंधनाने गमावली आहे. तरीही मायावती आणि अखिलेश या दोन शक्ती एक होत आहेत ही गोष्टही काही दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

Leave a Comment