जगभरातील उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोने कमावले ६१ लाख युरो


नवी दिल्ली – अनेक देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करुन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कोट्यवधींची कमाई करत आहे. इस्रोच्या नावावर पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलच्या (पीएसएलव्ही) माध्यमातून एकाचवेळी २८ देशांचे २०९ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम आहे. २३ जून रोजी पीएसएलव्ही सी ३८ च्या मदतीने इस्रोने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोने भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण करताना याचवेळी १४ देशांचे २९ उपग्रह अवकाशात सोडले. इस्रोचा व्यावसायिक विभाग असलेल्या एँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडने या माध्यमातून ४५ कोटींची कमाई केली आहे. तर इस्रोने २०१३ ते २०१५ या कालावधीत ६१ लाख युरो म्हणजेच ६०० कोटींची रग्गड कमाई केली आहे.

इस्रोने २३ जून रोजी पीएसएलव्हीच्या माध्यमातून कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले. इस्रोने याआधी १५ फेब्रुवारीला पीएसएलव्ही सी३७ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकाचवेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. पण या प्रक्षेपणातून इस्रोने नेमकी किती कमाई केली, याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

अंतराळातील कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या क्षेत्रात स्पेसएक्सची फाल्कन ९, रशियाची प्रोटॉन यूएलए आणि एरियनस्पेस यासारख्या कंपन्या दमदार कामगिरी करत आहेत. पण स्वस्त दरात ही सेवा इस्रो पुरवत असल्याने इस्रोच्या एँट्रिक्स कॉर्पोरेशनने उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. लहान उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे नैपुण्य इस्रोने मिळवले आहे. त्यामुळेच अनेक परदेशी कंपन्या स्पर्धेत असूनही इस्रोला प्राधान्य दिले जाते. ‘खर्च कमी आणि यशाची हमी’ या सूत्रामुळे इस्रोने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे.

Leave a Comment