रिलायन्स जिओमुळे शेअर्स बाजारात एअरटेल, आयडियाला बसला फटका


मुंबई – शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ३० हजार कोटींचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा केल्यानंतर तसेच जिओच्या यशाचा पाढा वाचल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये २ टक्के वाढ झाली. प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेलच्या शेअर्सच्या किमतीमध्ये त्याचवेळी ३ टक्के आणि आयडीया सेल्युलरच्या शेअर्सच्या किमतीमध्ये ६ टक्के घट झाली.

एअरटेल आणि आयडिया या प्रतिस्पर्धी कंपन्यांना रिलायन्सची जिओ इंटरनेट सेवा सुरु झाल्यापासून चांगलाच फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये रिलायन्सच्या आज वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होण्याआधीच ४ टक्के वाढ झाली होती. एअरटेलला रिलायन्सच्या जिओच्या सेवेमुळे प्रत्येक तिमाहीत ५५० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्याचबरोबर रिलायन्सच्या नवीन फोन साध्या टिव्हीला जोडता येणार आहे आणि विविध वाहिन्या बघता येणार आहेत. यामुळे केबल सेवा व डिटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनाही फटका बसला आहे. डिश टिव्ही, हॅथवे या कंपन्यांचे शेअर्सही २ ते ३ टक्क्यांनी स्वस्त झाले.

Leave a Comment