गोल्डन बाबाची बीएमडल्ब्यू,ऑडी ताफ्यातून कावड यात्रा


हरिद्वार पासून ते दिल्लीतील गांधीनगरच्या लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत २०० किमीच्या कावड यात्रेसाठी निघालेले सुधीर मक्कड उर्फ गोल्डन बाबा २१ जूलैला दिल्लीत पोहोचत असून तेथील भोलेनाथावर जलाभिषेक करणार आहेत. त्यांची ही यात्रा लोकांचे आकर्षण बनली आहे कारण त्यांच्या ताफ्यात २५ लग्झरी कार्स. ३० सुरक्षा रक्षक आहेतच पण बाबांनी अंगावर १५ किलो सोनेही परिधान केले आहे. यात २१ चेन,२१ लॉकेट, बाजूबंद, अंगठ्या, सोन्याचे जाकीट यांचा समावेश आहे शिवाय बाबांनी २७ लाख रूपये किमतीचे रोलेक्स घड्याळही घातले आहे. यावरूनच त्यांना गोल्डन बाबा असे नांव पडले आहे.

त्यांच्या या कावड यात्रा ताफ्यात १ बीएमडब्ल्यू, २ ऑडी, ३ फॉर्च्युनर,२ इनोव्हा व अन्य १७ वाहने आहेत. त्यांच्या या यात्रेसाठी ९० लाख ते १ कोटी रूपये खर्च केला जात आहे. बाबांची मालमत्ता १५० कोटींची असून २०१८ साली ते शेवटची म्हणजे २५ वी कावड यात्रा करणार आहेत. पहिली यात्रा त्यांनी २५० रूपये खर्च करून २०० रूपयांचे १० ग्रॅम सोने घालून केली होती. हे बाबा मूळचे दिल्लीचेच असून ते कपड्यांचे व्यापारी होते. कांही काळानंतर त्यांनी संन्यास घेऊन शिवभक्तीत सारे आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मालमत्तेतूनच या कावडी यात्रेचा खर्च भागविला जातो असेही समजते.