नोटबंदीमुळे ४ महिन्यात गेल्या १५ लाख लोकांच्या नोकऱ्या


नवी दिल्ली: केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी आणि काळ्या पैशांवर रोख लावण्यासाठी नोटबंदी ऎतिहासिक निर्णय घेतला होता. नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त या नोटबंदीचा फटका बसला असल्यासचे चित्र पाहायला मिळत आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे १५ लाख लोकांना अवघ्या चार महिन्यांत नोकरी गमवावी लागली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही धक्कादायक माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (CMIE)ने केलेल्या एका पाहणीतून समोर आली आहे. नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीवर त्याच्या घरातील चार लोक अवलंबून असतात. त्यामुळे १५ लाख बेरोजगारांचा हिशेब केल्यास नोटबंदीने एकूण ६० लाख लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याचे ‘सीएमआयई’च्या अहवालात म्हटले आहे.

हे सर्वेक्षण ‘कंज्युमर पिरामिड हाउसहोल्ड’ या नावाखाली करण्यात आले आहे. नोटबंदी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०१७या दरम्यान देशातील एकूण ४० कोटी ५० लाख नोकऱ्या बाधित झाल्या. त्याआधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान ४० कोटी ६५ लाख नोकऱ्या होत्या. त्या आधारे नोटबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांत जवळजवळ १५ लाख लोक बेरोजगार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी ते एप्रिल २०१६ दरम्यान तरुणांना मिळणारा रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे या सर्वेक्षणाअंतर्गत गोळा केले आहेत. हा सर्वे करताना १ लाख ६१ हजार घरातील ५ लाख १९ हजार तरुणांसोबत नोकरीसंदर्भात चर्चा केली. नोटबंदीआधी ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता, परंतु नोटबंदीनंतर ४० कोटी ५० लाख लोकांकडे रोजगार राहिला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment