शह काटशह


सध्या राजकारणात नरेन्द्र मोदी आणि त्यांचे विरोधक यांच्यात जो शह काटशहाचा खेळ सुरू आहे त्याचा विचार करायला लागतो तेव्हा २००७ सालच्या काही घटना आठवतात. त्यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली होती. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत नव्हते त्यामुळे सोनिया गांधी यांनी अन्य सहयोगी पक्षांशी चर्चा करून उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला. त्यात डाव्या आघाडीचेही नेते होते आणि मायावतीही होत्या. चर्चेेत सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले. या नावाला सर्वांचाच पाठींबा मिळणार असे दिसायला लागले पण केवळ मायावती यांनी विरोध केला आणि हे नाव मागे पडले.

तसे मायावती आणि सुशीलकुमार यांच्यात काही वितुष्ट नाही पण मायावतींनी त्यांच्या नावाला विरोध केला. कारण कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या रूपाने दलित राष्ट्रपती केला तर दलित समाजात कॉंग्रेसविषयी सहानुभूती निर्माण होईल आणि आपला हा हक्काचा मतदार वर्ग आपल्यापासून दूर जाईल अशी भीती त्यांना वाटली. मायावती आपला हा मतदारवर्ग आपल्यापासून दूर जाऊ नये याचा किती विचार करतात याचे ते निदर्शक होते. २००७ साली जे घडले नाही ते आता घडत आहे. सोनिया गांधी यांना मायावती यांच्या विरोेधामुळे दलित राष्ट्रपती करता आला नाही पण आता नरेन्द्र मोदी यांनी मायावती यांच्या नाकावर टिच्चून रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित राष्ट्रपती केला आहे. कोविंद हे केवळ दलित समाजातलेच आहेत असे नाही तर ते मायावती यांच्या उत्तर प्रदेशातले आहेत. त्यामागे मायावती यांचा जनाधार आपल्याकडे खेचून घेण्याचा मोदी यांचा डाव आहे. त्यामुळे मायावती सावध झाल्या आहेत.

नरेन्द्र मोेदी यांनी दलित समाजाला आपलेसे करायला सुरूवात केली आहे याचा सर्वात अधिक धक्का मायावती यांना बसला आहे. म्हणून मायावती यांनीही नरेन्द्र मोदी यांना याच दलित समाजात बदनाम करण्याचा डाव टाकला आहे. त्यांनी काल राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामागे मोदी यांच्या दलितवादी राजकारणाला शह देण्याचाच हेतू आहे. नरेन्द्र मोदी आपल्या प्रतिस्पर्ध्यालाह नामोहरम करण्यासाठी आधी असा काही अनपेक्षित डाव टाकतात की त्यामुळे त्यांचा प्रतिस्पर्धी अस्वस्थ होतो आणि नंतर मोदींच्या डावाला प्रतीडावाने उत्तर देण्यात गुंतून पडतो. मायावती यांचे तसेच झाले आहे. त्या आता मोदींना कसा शह द्यावा याचा विचार करत बसल्या आहेत. लालूंनाही मोदींनी असेच लंबे केले आहे.

Leave a Comment