प्राचार्यांचे पालकांना पत्र


गेल्या पिढीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरला पाठवलेले एक पत्र फार वाचले जात असे. हेडमास्तरने आपल्या मुलाविषयी काय दृष्टीकोन बाळगावा आणि त्याला कसे तयार करावे याबाबत ते पत्र होते. पण आता मलेशियातल्या एका प्राचार्याने पालकांना लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते ज्यांच्या वाचनात आले नसेल त्या पालकांनी ते जरुर वाचले पाहिजे. कारण मुलांनी इंजिनिअर किंवा डॉक्टर होणे यातच आपले आणि त्याच्याही आयुष्याचे सार्थक आहे अशी संकुचित भावना बाळगणार्‍या पालकांचे अगदी गोड शब्दात कान टोचले आहेत. त्यात हे हेडमास्तर म्हणतात. मित्रांनो तुमचे मूल आता परीक्षेला बसत आहे आणि त्याला किती मार्क मिळतात याविषयी तुम्ही खुप आतूर आहात. पण लक्षात ठेवा.

काही मुले कलावंत असतात. त्यांना गणितातले काही कळत नाही. काही मुले उद्योजक प्रवृत्तीचे असतात त्यांना इतिहास आणि इंग्रजी व्याकरणामध्ये काही गम्य नसते. काही मुलांना संगीत आवडते. त्यांना रसायन शास्त्रामध्ये रस नसतो. काही मुले खेळाडू असतात. त्यांची फिजिकल कंडिशन चांगली असली तरी त्यांना फिजिक्समध्ये रूची नसते. तुमच्या मुलाला शाळेच्य परीक्षेमध्ये अगदी उच्च दर्जाचे मार्क मिळाले नाहीत तरी वाईट वाटून घेऊ नका. त्याला टोचून बोलू नका. त्याच अपमान करू नका आणि त्याचा आत्मविश्‍वास जाईल असे काही करू नका. त्याला म्हणावे कमी मार्क मिळाले असतील काही हरकत नाही. ही तर एक परीक्षा आहे.

त्याला सांगा की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला अजून खूप परीक्षा द्यायच्या आहेत. एक परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तू जगण्याच्या लायकीचा नाहीस असे मी काही मानत नाही. तुला कमी मार्क मिळाले तरी तुझ्यावरचे माझे प्रेम कमी होण्याचे काही कारण नाही. मी मुळात तुझी लायकी या परीक्षेवरून ठरवतच नाही. असा संदेश त्याला द्या आणि तुमचे मूल आत्मविश्‍वासाने कसे भरून जाते आणि सार्‍या जगाला पादाक्रांत करण्याची त्याची विजीगिषा कशी वाढते ते पहा. त्याला परीक्षेत कमी मिळालेले मार्क त्याच्या आयुष्याची स्वप्ने हिरावून घेण्यास कारणीभूत ठरता कामा नयेत याचा साक्षात्कार तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक लक्षात ठेवा इंजिनिअरिंग आणि डॉक्टर हेच केवळ जगातले आनंदी लोक आहेत असे समजण्याचे काही कारण नाही.

Leave a Comment