प्रेमी जोडप्यांना आश्रय देणारे शुंगचूल महादेव मंदिर


हिमाचलमधील निसर्ग जितका सुंदर आहे तितक्याच या राज्यात पाळल्या जाणार्‍या परंपराही मोहक आहेत. कुल्लू जिल्ह्यातील शंाघड गावाची देवता असलेले शंगचूल महादेव मंदिर अशीच एक सुंदर परंपरा सांभाळून आहे. श्रावण महिन्यात शिव उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. या गावातील शंगचूल महादेव ही देवता घरातून पळून आलेल्या प्रेमी युगलांना त्याच्या आश्रयाखाली घेते व हे जोडपे जोपर्यंत या देवतेच्या सीमाक्षेत्रात आहे तोपर्यंत त्यांना कोणाकडून कसलीही इजा होऊ दिली जात नाही. यात जातीधर्माचा विचार केला जात नाही. या देवतेची मालकी १०० बिघे जमिनीवर आहे.

हे छोटेस गांव पांडवकालीन आहे. असे सांगतात, पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासातील कांही काळ येथे घालविला होता. कौरव त्यांना शोधण्यासाठी आले तेव्हा शंगचूल महादेवाने त्यांना थांबविले व माझ्या आश्रयाला पांडव आले आहेत तुम्ही येथून निघून जा असे बजावल्यावर कौरव तेथून परतले. त्यामुळे प्रेमी युगले येथे आली तर ती देवाच्या आश्रयाला आली असे मानले जाते.


या गावात पोलिस आणण्यास बंदी आहे तसेच दारू, सिगरेट, चामड्याच्या वस्तूही आणता येत नाहीत. शस्त्रे आणण्यावर बंदी आहे तसेच भांडणतंटा करायलाही बंदी आहे. येथे कुणालाही आवाज चढवून बोलण्याची परवानगी नाही. प्रेमी युगले येथे आली तर त्यांच्या कुटुंबातील वाद जोपर्यंत संपत नाहीत व त्यांच्या विवाहला मान्यता मिळत नाही तोपर्यंत मंदिराचे पुजारी त्यांची काळजी घेतात असेही समजते.

Leave a Comment