त्वचेवर लावता येणारे स्वास्थ्य दर्शक उपकरण


जपानी वैज्ञानिकांनी प्रकृतीवर लक्ष ठेवणारे नवीन डिव्हाईस तयार केले असून हे उपकरण लवचिक पदार्थापासून बनविले गेले आहे व ते मानवी त्वचेवर घालता येते. या उपकरणावर हायपोएलजेनिक इलेक्ट्रीक सेन्सर बसविले गेले आहेत. यामुळे रक्तदाब, हृदयाचे धडकणे व अन्य आरोग्य बाबींवर लक्ष ठेवता येते. त्यासाठी इलॅस्टीक इलेक्ट्रोडचा वापर केला गेला आहे. हे उपकरण दीर्घ काळ त्वचेवर घालता येते. त्याच्या वापराने त्वचेला सूज येणे, रॅश येणे यासारखे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत असा दावा केला जात आहे.

या उपकरणात पाण्यात विरघळणारे पॉलिमर वापरले गेले असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला गेला आहे. १ आठवडाभर हे उपकरण त्वचेवरून न काढता शरीराच्या आवश्यक नोंदी घेता येतात. या उपकरणातील फिल्म अतिशय तलम असून त्यात रबर शीटचा वापरही केला गेला आहे. टोकियो विद्यापीठातील प्रोफेसर तकाओ सेमिया यांनी हे उपकरण वापरण्यात अतिशय सुरक्षित असल्याचे व आठवड्यापेक्षाही थोडा अधिक काळ ते त्वचेवर ठेवता येत असल्याचे सांगितले.

Leave a Comment