शास्त्रज्ञांनी तयार केले 3-डी प्रिंटेड मानवी हृदय


हुबेहूब मानवी हृदयासारखे असलेले आणि हृदयासारखेच कार्य करणारे मुलायम सिलिकॉनचे हृदय शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. त्यामुळे हृदय निकामी झालेल्या लाखो लोकांना आशेचा किरण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जगभरात दोन कोटी साठ लाख लोकांना हृदय निकामी होण्याचा त्रास असतो, मात्र हृदय प्रत्यारोपणासाठी पुरेशा संख्येने लोक उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्तम काम करणारे कृत्रिम हृदय ही काळाची गरज आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हे कृत्रिम हृदय 390 ग्रॅमचे असून त्याचे आकारमान 679 घन सेंटीमीटर आहे. या हृदयाला मानवी हृदयाप्रमाणेच उजव्या व डाव्या झडपा आहेत. आर्टिफिशियल ऑर्गन्स नावाच्या संशोधन नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

“हा अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेला सिलिकॉनचा ठोकळा आहे,” असे स्वित्झर्लंडमधील ईटीएच झुरिचमधील संशोधक विद्यार्थी निकोलस कोहर्स यांनी सांगितले.

मात्र सध्या या हृदयाची क्षमता केवळ 3000 ठोक्यांची आहे म्हणजेच ते अर्धा ते पाऊण तास चालू शकते. त्यानंतर हा पदार्थ ताण सहन करू शकत नाही.

“ही केवळ शक्यता तपासणीची चाचणी होती. प्रत्यारोपणासाठी तयार असलेले हृदय देणे, हे नव्हे तर कृत्रिम हृदयाच्या विकासासाठी नव्या दिशेने विचार करणे हे आमचे लक्ष्य होते,” असे कोहर्स म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment