प्रामाणिकपणाला शिक्षा


कर्नाटकातील बंगलोंरच्या पारप्पना अग्रहार मध्यवर्ती कारागृहात कैदेची शिक्षा भोगत असलेल्या तामिळनाडूच्या अद्रमुकच्या नेत्या शशिकला नटराजन यांना विशेष वागणूक दिली जाते अशा प्रकारचा गौप्यस्फोट याच कारागृहाच्या उपाधीक्षक डी. रुपा यांनी केला होता. या गौप्यस्फोटाने कर्नाटकाचे पोलीस दल हादरले आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा डी. रुपा यांच्या या आरोपात तथ्य असल्याचे लक्षात आले. परंतु कर्नाटकातले कॉंग्रेसचे शासन मोठे भ्रष्ट आहे. त्यामुळे शशिकला यांना मिळणार्‍या विशेष सोयींबद्दल त्या देणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा करण्या ऐवजी या सरकारने डी. रुपा यांनाच अप्रत्यक्ष शिक्षा केली. राज्य सरकार आयपीएस अधिकार्‍यांना थेट शिक्षा करू शकत नाही म्हणून शशिकला यांच्या या वेगळ्या सोयींच्या बाबतीत त्यांच्याकडे तक्रार करणार्‍या याच कारागृहातल्या ३१ कैद्यांना शिक्षा करण्यात आली.

या कैद्यांना काल मध्यरात्री अचानकपणे बळ्ळारी आणि बेळगाव या दोन ठिकाणच्या कारागृहात पाठवून देण्यात आले. तिथल्या कारागृहांमध्ये बेंगलोरपेक्षा कमी सोयी असल्यामुळे त्यांच्यासाठी ही शिक्षाच ठरली आहे. असे असले तरी डी. रुपा यांनी केलेला आरोप मात्र सत्य आहे. बेंगलोरच्या कारागृहातील अधिकारी लक्षावधी रुपयांची लाच घेऊन अशा व्हिआयपी कैद्यांना विशेष सोयी देत असतात. खरे म्हणजे अशा सोयी देता येत नाहीत. कारागृहात ज्या प्रकारचे पलंंगपोस किंवा उशांचे अभ्रे मंजूर असतात तसेच दिले पाहिजेत परंतु असे अभ्रे आणि पलंगपोस बदलून द्यायचे असतील तरीसुध्दा उच्च न्यायालयाची परवानगी लागते. इतका कारागृहाचा कायदा कडक असतो. परंतु इथले अधिकारी धनदांडग्या कैद्यांना पंचतारांकित सोयी पुरवत असतात.

अशा भ्रष्टाचाराबद्दल कोणी आवाज उठवत नाही पण डी. रुपा यांनी तो उठवला. त्यांनी हा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत केला. ती त्यांची चूक झाली. परंतु त्या चुकीचे निमित्त करून मुख्यमंत्र्यांसहीत सगळ्या प्रशासनाने डी. रुपा यांच्या मूळ आरोपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. डी. रुपा या फार निस्पृह आणि धडाडीच्या पोलीस अधिकारी आहेत आणि त्या तेवढ्याच साध्या आहेत. त्यांचे पतीसुध्दा आयपीएस अधिकारी आहेत. परंतु त्यांची एकुलती एक मुलगी कन्नड माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकत असते. दोघेही आयपीएस अधिकारी असल्यामुळे ते आपल्या मुलीला श्रीमंतांच्या शाळेत पाठवू शकतात. परंतु त्यांनी अट्टाहासाने आपल्या मुलीचे शिक्षण सरकारी शाळेतच सुरू केले आहे. ही माहिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकते.

Leave a Comment