निष्ठावंत कार्यकर्ता


भारतीय जनता पार्टीने म्हणजेच एनडीए आघाडीने आपला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून काल ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांचे नाव जाहीर केले. भाजपाच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवडताना मोदी आणि शहा या दुकलीने अपेक्षित नावांना फाटा देऊन रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केले तेव्हा हे नाव सर्वस्वी अनपेक्षित ठरले. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवडताना मात्र या दुकलीने धक्का वगैरे काही न देता अपेेक्षित नावातलेच एक नाव जाहीर केले. दोन दिवसांपासून या नावाचा अंदाज व्यक्त केला जायला लागला होता. कारण तीन दिवसांपासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या दुकलीला या बाबत काही सुचविले होते. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देताना तो मागास जातीतला आणि उत्तर भारतातला निवडला आहे आता जातीय समीकरण आणि विभागीय समतोल साधण्यासाठी दक्षिणेतला आणि उच्चवर्णीय उमेदवार उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर करावा असे सरसंघचालकांनी सूचित केले होते. त्यामुळे सर्वांनाच आता या पदासाठी कोणाला निवडणार याचा अंदाज आलाच होता.

व्यंकय्या नायडू हे ४० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीं आणि जनता पार्टीच्या कामात आहेत आणि त्यांच्या खाती आता सगळ्या प्रकारचा अनुभव जमा झाला आहे. संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव आहेच पण विधिमंडळीय आणि सांसदीय कामाचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये काही काळ मंत्रिपद उपभोगलेले आहेच पण आताही ते मोदी सरकारमध्ये आहेत. त्यांच्याकडे नागरी विकास आणि माहिती तसेच प्रसारण ही खाती आहेत. ते मोदी सरकारमध्ये ज्येष्ठतेत पाचव्या क्रमांकाचे मंत्री आहेत. ते आता या पदाचा राजीनामा देतील आणि उद्याच आपला अर्ज दाखल करतील. त्यांना उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचे अध्यक्षपद स्वीकारावे लागेल. त्यांना या संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाच्या कामाचाही अठरा वर्षांचा अनुभव असल्याने त्यांना या सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे आणि मुत्सद्दीपणाने चालवणे सोपे जाईल. भाजपाचे लोकसभेत बहुमत असले तरीही राज्यसभेत भाजपा अल्पमतात आहे. अशा स्थितीत हे काम चालवणे भाजपासाठी आव्हानात्मक आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी नायडू यांच्यासारखा मातबर माणूसच हवा होता. हे सभागृह चालवताना सांसदीय कामाचा अनुभव तर असावाच लागतो पण कामकाजाचे नियमही चांगले माहीत हवेत. नायडू यात वाकबगार आहेत. कारण त्यांनी मोदी सरकारमध्ये सांसदीय कामकाज मंत्री म्हणून चांगले काम केलेले आहे.

नायडू यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाच्या काळात अनेक समित्यांवर काम केले असून त्यातल्या काही समित्यांचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यांना इग्रजी भाषा चांगली अवगत आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. नायडू जेव्हा सांसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करीत होते तेव्हा त्यांनी विरोधी पक्षीयांशी समन्वय साधून संसदेचे काम कसे सुरळीत राहील याबाबत फार दक्षतेने काम केले आहे. काही वेळा या खात्याच्या मंत्र्याला खूप कष्ट करावे लागतात. सदनात सगळे सदस्य येण्याच्या आधी हजर रहावे लागतेे आणि विरोधकांच्या भेटी घेऊन त्यांचे कामकाजात सहकार्य मिळवावे लागते. व्यंकय्या नायडू हे या खात्याचे काम करताना ही सारी मेहनत करीत असत आणि विरोधकांना नीट हाताळत असत अशी अनेक वृत्तपत्रांनी त्यांची प्रशंसा केली आहे. हजरजबाबीपणा हे त्यांंचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी किवा सरकारवर काही टीका होते तेव्हा त्या टीकेचा काही निवडक शब्दात समाचार घेऊन टीका करणारांचे शब्द त्यांच्यावर उलटवण्याचे त्यांचे कसब अनेकदा दिसून आले आहे.

१९७७ साली ते जनता पार्टीच्या युवा शाखेचे कार्यकर्ते म्हणून आपल्या आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या राजकारणात उतरले. उत्तम ज्ञान आणि राजकारणात काम करण्याची समर्पण वृत्ती यामुळे त्यांनी थोडक्यातच आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा ते राज्य पातळीवरचे नेते म्हणून गाजायला लागले. ते आंध्र विधानसभेतही निवडून आले होते. सहा वर्षे ते आमदार होते आणि काही काळ विधिमंडळातल्या भाजपा गटाचे नेतेही होते. नंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. तिथे ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दोन वेळा अध्यक्ष आणि बराच काळपर्यंत सरचिटणीस होते. त्यांनी दोन वेळा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाची वाढ केली. त्याच्या सारख्या कार्यकर्त्याला आता देशातले हे उच्च पद मिळाले असल्याने त्यांच्या निष्ठापूर्ण सेवेचेे सार्थक झाले आहे. त्यांनी राजकारणात काही जबाबदार्‍या पार पाडताना कधीही पदाची अपेक्षा केली नाही आणि आपल्याला अमुकच एक पद मिळावे यासाठी कधी कोणाची मनधरणी केली नाही. त्यांना तरीही त्यांच्या लायकीचे हे पद मिळत आहे. त्यांची निवड ही आता केवळ औपचारिकताच राहिली आहे. ते आपल्या या कामातून संसदेच्या कामाला गती देतील आणि या जनतेच्या सभागृहाची पूर्वीची शान कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment