अंटार्टिका ध्रुवावर झाले शुभमंगल


अंटार्टिक ध्रुव परिसरातील ब्रिटीश अंटार्टिक टेरिटरीमध्ये जुली बॉम व टॉम सिल्व्हेस्टर यांनी आपला विवाह साजरा केला असून या भागात विवाह कायद्यात बदल झाल्यानंतर झालेला हा पहिलाच विवाह ठरला आहे. हे दोघेही या भागात गाईड म्हणून काम करतात. अंटार्टिका प्रायद्विपच्या पश्चिमेकडील एडिलेट आयलंडवरच्या रॉदेरा रिसर्च स्टेशनवर हा अनोखा विवाह पार पडला.

यावेळी वधू जुलीसाठी नारंगी रंगाचा वधूवेश बनविला गेला होता. हा वेश जुन्या तंबुच्या कापडापासून बनविला गेला. त्यावेळी येथील तापमान शून्याखाली ९ डिग्री होते. या विवाहाला २० लोक हजर होते व ते सर्व थंडीकाळात या स्टेशनची देखभाल करणारे आहेत. लग्नासाठीच्या अंगठ्या पितळ्यापासून नवरदेव टॉमने मशीनच्या सहाय्याने संशोधन केंद्रातच तयार केल्या. स्टेशन प्रमुख पॉल सॅमवेज यांनी हे लग्न लावले.


टॉम व जुली यांची पहिली भेट १० वर्षांपूर्वी वेल्स मध्ये झाली होती व ३ वर्षांपूवी त्यांच्या साखरपुडा झाला. हे दोघेही उत्तम गिर्यारोहक असून ब्रिटन अंटार्टिक सर्वेक्षण मोहिमेत त्यांची निवड केली गेली आहे. हे दोघे सांगतात, प्रथम पासूनच आम्ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. गेली दहा वर्षे आम्ही एकत्र जगभर फिरतो आहोत. मात्र अंटार्टिकावर आपले लग्न होईल असे कधी वाटले नव्हते.एक खरे की विवाहासाठी यापेक्षा अधिक सुंदर जागा असू शकत नाही हे आम्हाला पटले आहे. ही जागा निर्जन असली तरी येथे अ्राम्ही खूप चांगले मित्र जोडले आहेत.

Leave a Comment