जन-धन खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर जमा झाली ३०० कोटीपेक्षा जास्त रक्कम


नवी दिल्ली : आतापर्यंत ६४ हजार ५६४ कोटी रुपये जन-धन खात्यात जमा झाले असून, यातील ३०० कोटी रुपये हे नोटाबंदीनंतरच्या सात महिन्यातील असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.

‘जन-धन’ ही देखील पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी योजनांमधील एक असून बँकिंग सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा याचा मुख्य उद्देश आहे. शून्य रुपये बॅलेन्सवर बँकेत खाते उघडण्याची व्यवस्था या योजनेअंतर्गत आहे. पण नोटाबंदीनंतरच्या काळात जन-धन खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे.

माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०१७ पर्यंत देशभरात २८ लाख ९० कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. यातील सरकारी बँकांमधील खात्यात २३ लाख २७ कोटी रुपये जमा झाले. तर स्थानिक ग्रामीण बँकांमध्ये ४ लाख ७० कोटी रुपये आणि ९२ लाख ७० कोटी रुपये खासगी बँकांमध्ये, असे एकूण म्हणजेच, ६४ हजार ५६४ कोटी रुपये जमा झाले. तर १६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत देशभरात २५ लाख ५८ कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. ज्यात एकूण ६४ हजार २५२ कोटी रुपये जमा झाल्याचे अर्थराज्य मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना सांगितले.

Leave a Comment