मंगळावर २०३० पर्यंत मानवी वसाहत अशक्य


मंगळावर मानवी वसाहत निर्माण करणे हे अनेक देशांचे स्वप्न आहे आणि या ग्रहावर २०३० पर्यंत मनुष्यांना पाठविण्याची योजना नासा या अमेरिके संस्थेने अनेकदा बोलून दाखविले आहे. मात्र पैशांच्या कमतरतेमुळे या महत्त्वाकांक्षेला लगाम लागण्याची शक्यता असून अशी वसाहत स्थापन करणे अशक्य आहे, असे नासाने म्हटले आहे.

सध्याच्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार मानवाला घेऊन जाणारे यान मंगळावर पाठविण्याचा खर्च नासाला झेपण्यासारखा नाही, असे अंतराळातील मानवी मोहिमांचे प्रमुख विल्यम गर्स्टेनमायर म्हणाल्याचे ‘न्यूजवीक’ने म्हटले आहे.

नासाने या मोहिमेला प्राधान्य दिले असून आतापर्यंत अनेक मानवविरहीत याने मंगळावर पाठवले आहेत. त्यातील सर्वात अलीकडचे यान क्युरियोसिटी रोव्हर हे होते आणि ते ऑगस्ट २०१२ मध्ये पाठवण्यात आले होते. त्यासाठी २.५ अब्ज डॉलर्सचा खर्च आला होता. गर्स्टेनमायर यांच्या मते, मानवी मोहिमेसाठीच्या यानाचे वजन त्या यानापेक्षा २० पट अधिक असेल, म्हणजेच त्याच्या २० पट अधिक खर्च येईल. अमेरिकी सरकारने २०१७च्या आर्थिक वर्षात नासाकरिता १९.५ अब्जाची अंदाजपत्रकीय तरतूद केली आहे.

Leave a Comment