आयकर विभागाच्या रडारवर पाच लाखांपेक्षा जास्त लोक


नवी दिल्ली : देशातील सर्व नागरिकांनी नोटाबंदीच्या काळात आपल्याकडील जुन्या नोटा जमा केल्या. मात्र यातील ५ लाख ५६ हजार जणांच्या जुन्या नोटांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचे समोर येत आहे. ही माहिती आयकर विभागाच्या चौकशीतून समोर आली आहे.

अर्थ मंत्रालयाने नोटाबंदीनंतर काळ्या पैशांचा छडा लावण्यासाठी ३१ जानेवारीपासून ‘स्वच्छ धन अभियान’ सुरु केले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १७ लाख ९२ हजार नागरिकांकडून आर्थिक ताळेबंदाची माहिती मागवण्यात आली. यातील ९ लाख ७२ हजार नागरिकांनीच आर्थिक ताळेबंद सादर केला. उर्वरित नागरिकांच्या बँक तपशीलाची झडती आयकर विभागाकडून घेण्यात येत आहे.

तर एप्रिल महिन्यापासून या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु झाला. या टप्प्यानंतर ५ लाख ५६ हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचे समोर आले आहे. यातील १ लाख ४ हजार खातेदार हे ‘स्वच्छ धन अभियाना’च्या पहिल्या टप्प्यातील असल्याचे समोर येत आहे. ज्यांना खात्यातील जमा रक्कमेविषयी माहिती देता आली नव्हती. त्यांची ओळख पटवण्यातही आयकर विभागाला यश आले आहे. त्यांच्यावर आयकर विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे.