मणिपुरातील मदर मार्केट


भारताच्या ईशान्येकडील मणिपूर मध्ये इमा कॅथेल नावाचे आशियाईतील सर्वात मोठे खास महिला मार्केट आहे. इमा म्हणजे आई व कॅथेल म्हणजे बाजार. त्यामुळे हे मार्केट मदर मार्केट या नावानेही प्रसिद्ध आहे. येथे सर्व कारभार महिलांच्या हातात असून ४ हजाराहून अधिक दुकाने असलेल्या या बाजारात एकही पुरूष कर्मचारी नाही. हे मार्केट प्राचीन आहे. या बाजाराची सुरवात १६ व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते.

या बाजारामागची कथा अशी की १५३३ मध्ये येथे राजाचे राज्य होते. तो राज्यातील पुरूषांना युद्धावर अथवा भातशेतीसाठी पाठवित असे. यामुळे मागे गावात राहिलेल्या महिला शेतीची कामे करत तसेच दुकानदारीही करत. हीच या महिलांची दिनचर्या बनली. आज या मार्केट मध्ये सर्व प्रकारचा माल उपलब्ध असतो. कांही महिला दुकानदार आहेत, आदिवासी महिला भाजी, फळे यासारखा माल स्वतः विकतात किंवा दुकानदार महिलेला विकून माघारी परततात. या बाजारामुळे सुमारे ४ हजार महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले आहे.

Leave a Comment