पुण्यातील ‘आयुका’ लावला अवकाशातील ‘सरस्वती’ आकाशगंगेचा शोध


पुणे – अवकाशातील ‘सरस्वती’ नावाच्या आकाशगंगांच्या महासमूहाचा शोध लावल्याचे पुण्यातील ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेने गुरुवारी जाहीर केले. पृथ्वीपासून चारशे कोटी प्रकाशवर्षे दूर हा आकाशगंगासमूह आहे.

अवकाशातील महासमूह (सुपरक्लस्टर) ही आकाशगंगांची साखळी असते. गुरुत्वाकर्षणाने या आकाशगंगा किंवा आकाशगंगांचे समूह एकमेकांना जोडलेले असतात. ते आकाशगंगांबरोबर वायू, ‘डार्क मॅटर’ आणि मोकळ्या जागा असे विविध घटक एकत्र येऊन बनलेले असतात. अशा एका महासमूहात हजारो आकाशगंगा असू शकतात. आपली आकाशगंगा (‘मिल्की वे’) ही अशाच ‘लानिआकिआ’ नावाच्या महासमूहाचा एक भाग आहे. हवाई विद्यापीठात २०१४ मध्ये त्याचा शोध जाहीर करण्यात आला होता.

अवकाशातून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास विशिष्ट वेळ लागतो. त्यामुळे विश्वाचे वय जेव्हा एक हजार कोटी वर्षे होते, तेव्हा सरस्वती महासमूह जसा होता, तसा तो आता पाहायला मिळाला आहे. त्या आकाशगंगांच्या आयुष्यात अशा महासमूहांमध्ये फिरत राहतात. आकाशगंगांची निर्मिती त्यामुळे कशी होते ते जाणून घेण्यासाठी अवकाशातील महासमूह शोधणे आणि त्यातील विविध प्रकारच्या वातावरणाचा आकाशगंगांवर होणारा परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. ‘सरस्वती’ महासमूहाच्या शोधामुळे खगोलशास्त्रातील या नव्या संशोधन क्षेत्रास चालनाच मिळणार आहे.

Leave a Comment