फेसबुक वापरकर्त्यांमध्ये भारत नंबर १


सॅन फ्रॅन्सिस्को: अमेरिकेला पिछाडीवर टाकून फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या २४ कोटी १० लाख एवढी आहे; तर अमेरिकेत २४ कोटी लोक फेसबुक वापरतात. जगभरात २०० कोटी लोक फेसबुक वापरत असल्याचा फेसबुकचा दावा आहे.

भारतात फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ अमेरिकेपेक्षा दुप्पट असल्याचे फेसबुकने जाहिरातदारांसाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. मागच्या सहा महिन्यात भारतात ही वाढ २७ टक्के एवढी आहे; तर अमेरिकेत हेच प्रमाण १२ टक्के एवढे आहे. फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला असला तरीही एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प; म्हणजे केवळ १९ टक्के असल्याचे फेसबुकचा अहवाल सांगतो.

भारतात फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे. फेसबुक वापरणाऱ्यांपैकी ७५ टक्के वापरकर्ते पुरुष तर केवळ २५ टक्के महिला आहेत. अमेरिकेत मात्र फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५४ टक्के; अर्थात पुरुषांपेक्षा अधिक आहे. फेसबुकच्या भारतीय वापरकर्त्यांमध्ये निम्मे जण २५ वर्षाखालचे आहेत.

Leave a Comment