यांचे आले बुरे दिन


नरेन्द्र मोदी हे पंतप्रधान झाल्याची वस्तुस्थिती ज्यांच्या पचनी अजूनही पडलेली नाही आणि ज्यांना मोदी पंतप्रधान झाल्यापासून बुरे दिन आले आहेत त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कदाचित हे लोक या बातमीवर सुतकच पाळतील. कारण आता मोदी यांचे दिवस संपले आहेत अशा भ्रमात राहणार्‍या आणि राहुल गांधी पंतप्रधान होण्याच्या स्वप्नात रमणार्‍या या लोकांंना या बातमीमुळे चांगलीच चपराक बसणार आहे. ओइसीडी या संस्थेने जगभरात केलेल्या एका पाहणीत नरेन्द्र मोदी यांचे सरकार आपल्या देशात सर्वात लोकप्रिय आणि विश्‍वासार्ह ठरले आहे. या संस्थेने गव्हर्नमेंटस् ऍट अ ग्लान्स या पाहणीत मोदी यांच्या सरकारवर या देशातल्या ७३ टक्के मतदारांचा विश्‍वास असल्याचे दिसून आले आहे. याबाबत मोदी सरकार जगात सर्वात आघाडीवर आहे. पाहणी करणारी ही संस्था जागतिक पातळीवर आर्थिक निकषावर निरनिराळ्या पाहण्या करीत असते. तिला मोदी सरकार सर्वात लोकप्रिय आणि ग्रीसचे सरकार त्या देशात सर्वात कमी लोकप्रिय असल्याचे आढळले आहे.

ग्रीसमध्ये बहुमताने निवडून आलेले सरकार आहे पण या सरकारला सत्तेवर आल्यापासून विश्‍वासार्हता कमावता आलेली नाही. या सरकारने देशातल्या केवळ १३ टक्के मतदारांचा विश्‍वास कमावला आहे. आपल्याला आपले सरकार विश्‍वासार्ह वाटते का आणि आपल्याला ते संरक्षण पुरवणारे आहे याची खात्री वाटते का असे दोन प्रमुग प्रश्‍न या पाहणीत विचारण्यात आले होते. या पाहणीत मोदी यांचा पहिला क्रमांक आहे तर कॅनडाचा दुसरा क्रमांक आहे. कॅनडातल्या ६२ टक्के मतदारांचा आपल्या सरकारवर विश्‍वास आहे. त्या खालोखाल तुर्कस्तान, रशिया आणि जर्मनी या देशांचे क्रमांक आहेत. नुकतेच डोनॉल्ड ट्रंप हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. पण त्यांच्या देशातल्या केवळ ३० टक्के लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. ब्रिटनचाही या बाबतीत खालचा क्रमांक आहे. भारतात मात्र आपल्या सरकारवर विश्‍वास ठेवणारांचे प्रमाण ७३ टक्के आहे हे विशेष आहे. या यशामुळे मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांचे विरोधक आता पासूनच त्यांच्या कारभारावर टीका करून २०१९ साली त्यांच्या सरकारचा पाडाव करण्याची स्वप्ने पहायला लागलेे आहेत आणि देशात सगळा गोेंधळ माजला असल्याचे भ्रामक चित्र निर्माण करण्याचा प्रयास करीत आहेत. त्यांना या ७३ टक्के लोकांनी चोख उत्तर दिले असून त्यांच्या या प्रचारात काही तथ्य नसल्याचे दाखवून दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांनी देशातल्या भ्रष्टाचारावर प्रहार करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे जनता त्यांच्यावर खुष आहे. पण भ्रष्टाचार मुक्ततेची मोहिम ज्यांना परवडणारी नाही त्यांनी या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून आपल्यावरचा या संंबंधातला कलंक फिका करण्याचा आटापिटा सुरू केला आहे. या लोकांची अस्वस्थता आपण समजू शकतो. त्यांना मुळात मोदी पंतप्रधान झालेले आवडलेले नाही. मानवलेले नाही. त्यामुळे मोदी पंतप्रधान म्हणून कसे अपात्र आहेत आणि देशातल्या स्थितीवर त्यांचे नियंत्रण नसल्याने किती गोंधळ माजला आहे याचा अवाजवी आणि अवास्तव प्रचार करण्यास त्यांंनी सुरूवात केली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर देशातले मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम मतदार त्यांच्या विरोधात जातील असा या लोकांचा कयास होता. किंबहुना हे समाजघटक त्यांच्या विरोधात जावेत अशी या लोेकांची इच्छा होती. म्हणून देशात दलितांची आणि मुस्लिमांची हत्याकांडे सुरू आहेत असा अपप्रचार त्यांनी सुरू केला आहे. या प्रचारात काहीही तथ्य नाही हे सामान्य माणसाला चांगलेच माहीत आहे.

मोदी यांच्या विरोधात अशी प्रचाराची राळ उडवली जाण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. ते २००२ सालपासून गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या या विरोधकांनी वेळोवेळी अशा मोहिमा राबविल्या आहेत. तरीही मोदी यांनी तेव्हापासून गुजरातेत कॉंग्रेसला डोके वर काढू दिले नाही. समाजवादी आणि साम्यवादी यांच्यात तर तिथे डोके वर काढण्याची सुदूरही क्षमता नाही. आता हीच प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर चालली आहे. भाजपाने सत्तेवर आल्यापासून ठिकठिकाणी आपली माणसे नेमल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो पण अशा नेमणुकांची नावे सांगण्याची वेळ येते तेव्हा तीन पेक्षा अधिक नावे त्यांना सांगता येत नाहीत. अमर्त्य सेन यांच्यासारखे नोेबेल पुरस्कार विजेतेही या खोट्या यात्रेत सामील होत आहेत. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे म्हणून त्यांचे म्हणणे ग्राह्यच मानले पाहिजे असा भ्रम निर्माण करून त्यांच्या खोटेपणाला मुलामा दिला जात आहे. पण अमर्त्य सेन यांना वयाची ८० वर्षे पूर्ण केली असतानाही मनमोहनसिंग यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू केले होते. त्याची परतफेड करण्यासाठी अमर्त्य सेन मोदी यांनी लक्ष्य करीत आहेत. मोदी यांना या देशात आजतरी पर्याय नाही. म्हणून त्यांच्या विरोधकांना मोठा खेद होत असतो. त्यामुळेच चिडून ते मोदी यांच्याविरोधात खोटा नाटा प्रचार करीत असतात. प्रत्यक्षात मोदी यांना ७३ टक्के लोकांचा पाठींबा आहे.

Leave a Comment