पतंजलीचे गार्ड ट्रेनिंग व सेवा क्षेत्रात पदार्पण


योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली कंन्झुमर व्यवसायाने भल्या भल्या देश विदेशी कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळवून देशातील टॉप १० ब्रँड मध्ये जागा मिळविली असतानाच आता त्यांनी वेगळ्याच व्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. २०२० पर्यंत देशात ८० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित असलेल्या सुरक्षा रक्षक क्षेत्रात पतंजलीने पाऊल टाकले असून पराक्रम सुरक्षा प्रा.लिमिटेड या नावाने त्यांची प्रशिक्षण व सेवा केंद्रे सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भातला एका कार्यक्रम गुरूवारी पार पडला.

या संदर्भात रामदेवबाबा म्हणाले, त्यांनी ४० हजार कोटींची उलाढाल असलेल्या खासगी सुरक्षा गार्ड क्षेत्रात प्रवेश केला आहे.याअंतर्गत देशातील देशाभिमानी, प्रामाणिक व धाडसी तरूणांना गार्डचे प्रशिक्षण दिले जाईल शिवाय त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्‍याही उपलब्ध करून दिल्या जातील. सैनिकांप्रमाणे हे प्रशिक्षण असेल. देशात सध्या पाच कोटी खासगी सुरक्षा रक्षक आहेत मात्र त्यातील चांगल्या व कार्यक्षम रक्षकांची संख्या तुलनेने कमी आहे.

देशप्रेम, चांगली नितिमत्ता व आरेाग्यसंपन्न तसेच शिकलेल्या तरूणांना हे प्रशिक्षण निवृत्त लष्करी अधिकार्‍यांकडून देण्यात येणार असल्याचेही त्यानी सांगितले. सध्या गार्डना ८ ते १२ हजारांपर्यंत पगार मिळतो. मात्र आमच्या केंद्रातील तरूणांना आणखी चांगला पगार मिळेल अशा नोकर्‍या दिल्या जातील. यासाठी त्यांनी प्रामुख्याने कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

Leave a Comment