देशातील व्हीव्हीआयपी झाड


मध्यप्रदेशातील भोपाळ विदिशा मार्गावरील सलामतपूर येथे पहाडावर लावले गेलेले बोधीवृक्षाचे झाड हे देशातील व्हीव्हीआयपी झाड बनले आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लंकेतून आणलेल्या बाधीवृक्षाच्या झाडाची ही फांदी येथे लावली होती. ही सर्व जागा बौध्द विद्यापीठासाठी दिली गेली आहे. या झाडाच्या संरक्षणासाठी चोवीस तास गार्ड आहेत तसेच त्याला पाणी देण्यासाठी सांची नगरपालिकेतून खास टँकरची व्यवस्था केली गेली आहे. या झाडाभोवती १५ फूट उंचीची जाळी उभी करण्यात आली आहे. या झाडावर कोणताही रोग पडू नये म्हणून कृषी अधिकारी आठवड्यातून एकदा झाडाची पाहणी करायला येतात.

सप्टेंबर २०१२ मध्ये हे झाड लावले गेले होते तेव्हा हा परिसर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असत. आता मात्र येथील गर्दी थोडी कमी झाली आहे. हा संपूर्ण पहाड बौध्द विश्वविद्यालयातसाठी दिला गेला असून बौद्ध सर्कीटप्रमाणे येथील विकास काम सुरू आहे. बौद्ध अनुयायींसाठी हे झाड फार महत्त्वाचे आहे.

असे सांगतात की बुद्धाना बोधगयेतील ज्या पिंपळवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाची फांदी सम्राट अशोकाने श्रीलंकेला नेली होती. त्याचा आता विशाल वृक्ष बनला असून तो अनुराधापुरम येथे आहे. श्रीलंकन राष्ट्रपतीनी लंकेतील वृक्षाची फांदी आणून येथे लावली आहे. या झाडाची जपणूक फार काळजीपूर्वक केली जात आहे. झाडाचे एखादे पान जरी वाळले तरी मोठा गहजब केला जातो असे येथील सुरक्षा रक्षक सांगतात. या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाला १२ ते १५ लाख रूपये खर्च केले जातात.

Leave a Comment