या मंदिरात बाप्पा करतात व्हिसाच्या प्रार्थना पूर्ण


खास नवसाला पावणारी अनेक मंदिरे असतात आणि तेथील जागृत दैवत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असतात. असेच एक मंदिर तमिळनाडूत असून येथील देवता अक्षरशः जगावेगळी आहे. येथे परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांच्या व्हिसाच्या प्रार्थना पूर्ण होतात, असा भक्तांचा अनुभव आहे.

पळवतंगळ येथे हे मंदिर असून ते 29 वर्षे जुने आहे. मात्र गेल्या नऊ वर्षांपासूनच येथे व्हिसाच्या इच्छुकांना गणपती बाप्पा पावत आहेत. त्यामुळे संपूर्ण तमिळनाडूतून भक्त येथे येत आहेत.

विशेष म्हणजे चेन्नईच्या दूतावासापासून हे मंदिर फक्त 10 किलोमीटरवर आहे. येथे भक्त फूल, नारळ, उदबत्ती, केळे अशा पूजेच्या सामानासोबत हातात पासपोर्ट घेऊन उभे राहतात. “ हे लोक व्हिसा मिळविण्यासाठी येथे येतात,” असे हे मंदिर बांधणाऱ्या आर. जगन्नाथन यांनी सांगितले.

हे मंदिर 1988 साली बांधण्यात आले तेव्हा ते श्री लक्ष्मी गणपती मंदिर या नावाने प्रसिद्ध होते. “हळूहळू मंदिरात येणाऱ्या व्हिसाच्या अर्जदारांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी आम्ही त्याचे नामकरण पुळ्ळैयार – व्हिसा गणपती असे नामकरण केले,” असे जगन्नाथन म्हणाले.

Leave a Comment