‘जिओ’चा डाटा सर्च इंजिन तयार करण्यासाठी केला हॅक


जोधपूर – ‘मास्टर्स इन कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन’ केलेल्या तरुणाने ‘जिओ’चा डाटा सर्च इंजिन तयार करण्यासाठी हॅक केल्याचे तपासात उघड झाले असून त्या डाटा हॅक करण्यासाठी तरुणाने जिओच्या रिटेलर्सचे युजरनेम आणि पासवर्ड मिळवले होते अशी माहिती समोर आली आहे.

चार दिवसांपूर्वी रिलायन्स ‘जिओ’चा डाटा हॅक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. देशभरात या घटनेने खळबळ माजली होती. राजस्थानमधून पोलिसांनी याप्रकरणात २४ वर्षाच्या इम्रान चिम्पा या तरुणाला अटक केली होती. ग्राहकांचा डाटा इम्रानने हॅक का केला याचा खुलासा आता झाला असून इम्रान चिम्पाने ‘मास्टर्स इन कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन’ केले आहे. एक सर्च इंजिन त्याला तयार करायचे होते. यात ग्राहकाचे नाव किंवा फोन नंबर टाकताच त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार होती. त्याने याची सुरुवात जिओपासून केली.

रिलायन्स जिओच्या रिटेलर्सचे युजरनेम आणि पासवर्ड इम्रानने मिळवले होते. या युजरनेम आणि पासवर्डचा वापर करुन रिटेलर मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना रिचार्ज करुन देतो. इम्रानने याद्वारे जिओच्या सुमारे १२ कोटी ग्राहकांचा डाटा हॅक केला. जिओच्या सिस्टममधून डाटा स्वत:च्या सिस्टममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याने एक सॉफ्टवेअर तयार केले होते. सर्च इंजिनची ही हौसच इम्रानला तुरुंगात नेण्यासाठी कारणीभूत ठरली.