मुस्लीम व्यक्तीने लावला होता अमरनाथ गुहेचा शोध


आज हिंदूंसाठी अत्यंत पवित्र बनलेली अमरनाथ यात्रा दहशतवादी हल्लयांमुळे चर्चेत आली असली तरी प्रत्यक्षात ५०० वषाँपूवी या गुहेचा शोध एका मुस्लीम व्यक्तीने लावला होता हे अनेकांना माहिती नाही. यामुळे आजही अमरनाथ यात्रेशी या परिवाराचे नांव जोडले गेले आहे. बूटा मलिक असे या गूहा शोधणार्‍या व्यक्तीचे नांव होते. आज त्यांचे वंशज बटकोट या बूटा यांच्या नावावरून पडलेल्या गांवी राहतात.

या परिवारातील गुलाम हसन मलिक सांगतात आम्ही जे परंपरने ऐकले आहे, त्यानुसार बूटा मलिक शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी पहाडात नेत असत. तेथे त्यांची एका साधुशी भेट झाली व दोघांत मैत्री निर्माण झाली. एकदा थंडी खूपच पडल्याने मलिक एका गुहेत गेले मात्र तेथेही थंडी थांबेना तेव्हा साधूंनी त्यांना एक कांगडी दिली. कांगडी म्हणजे थंडीच्या काळात गळ्यात घालता येणारी एक प्रकारची शेगडी. ती आजही काश्मीरमध्ये वापरली जाते. रात्री तेथेच मुक्काम करून मलिक गुहेबाहेर आले तेव्हा त्यानी पाहिले की कांगडी सोन्याची बनली होती.


गुहेतून बाहेर पडताच त्यांना साधुंचा एक जत्था शिव महादेवाच्या शोधात हिंडत असल्याचे दिसले. त्यानी या साधूंना मी शिवाला साक्षात भेटलो आहे असे सांगून या गुहेत आणले तेव्हा तेथे अतिविशाल असे बर्फाचे शिवलिंग पार्वती गणेशासह असल्याचे साधूंना दिसले. मात्र मलिक यांना पुजा कशी करायची याची माहिती नसल्याने त्यांनी गणेश्वर गावातून काश्मीरी पंडितांना बोलावले व त्यांनी या लिंगाची पूजा केली व तेव्हापासून ही यात्रा सुरू झाली.

आजही मलिक परिवार, काश्मीरी पंडित व महंत या तीन प्रकारचे लोक एकत्र येंऊन छडी मुबारकची परंपरा व प्रथा पूर्ण करतात. मलिक याना शिवाकडून मिळालेली सोन्याची कांगडी कुठे आहे याची कांही माहिती नाही. मात्र ते सांगतात बुटा यांच्या मृत्यूनंतर जंगलात त्यांचा दर्गा उभारला गेला. आजही हा परिवार अमरनाथ यात्राकाळात अभक्ष्य भक्षण करत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार या यात्रेसंबंधी काश्मीरमधल्या सर्व मुस्लीम समुदायात सन्मान असून ते यात्रेकरूंची मनापासून सेवा करण्यासाठी सज्ज असतात.

Leave a Comment