टाटा कन्सल्टन्सीचा लखनौला बायबाय?


गेली ३३ वर्षे लखनौतून आपला कारभार पाहात असलेल्या टाटा कन्सल्टन्सीने आता लखनौचा निरोप घेण्याची तयारी सुरू केल्याचा दावा तेथील कर्मचार्‍यांनी केला असून त्या संदर्भात मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी, पंतप्रधान मोदी, माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कार्यालयाचे स्थलांतर थांबविण्यात हस्तक्षेप करावा अशी पत्रे रवाना केली असल्याचे समजते..

या कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार कंपनीतील अधिकार्‍यांनी बुधवारी तोंडीच कंपनीचे कार्यालय व येथील सर्व प्रोजेक्ट अन्यत्र हलविले जाणार असल्याचे कर्मचार्‍यांना सांगितले. येथील कंपनीचे काम थांबवून वर्षअखेर पर्यंत येथील सर्व प्रोजेक्टस अन्यत्र नेले जाणार असल्याचे समजताच कर्मचार्‍यांनी त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची गळ घातल्याचे सांगितले जात आहे. लखनौतील हे कार्यालय ३३ वर्षापूर्वी सुरू झाले तेव्हा येथे ५० कर्मचारी होते. आता ही संख्या १७०० वर गेली आहे. या शिवाय सुरक्षा, हाऊसकिपिंग अशा कामासाठी अतिरिक्त ५०० कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी प्रोजेक्ट दुसरीकडे हलले तर तेथे जाऊन नव्याने बस्तान बसविण्यास उत्सुक नाहीत. अनेकांचे कौटुंबिक प्रश्न आहेत यामुळे हे कार्यालय हलविले जाऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. टीसीएस मधील अधिकारी वर्गाने मात्र या संदर्भात कांहीही सांगण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment