आयकर परतावा उशिरा भरणे पडणार महागात,


नवी दिल्ली: आयकर भरण्यासाठी नोकरदारांमध्ये जुलै महिना आला धावपळ सुरू होते. काही लोक ही प्रक्रिया लवकर करतात पण काही लोक याकडे कानाडोळा करतात. अनेकजण ठरलेल्या तारखेत आयकर भरत नाहीत. आता अशा लोकांना मोठा फटका बसणार आहे. आता आयकर भरण्यास उशीर केल्यास दहा हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून (२०१७-१८) न करता पुढील आर्थिक वर्षापासून (२०१८-१९) सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

करदात्यांनी पुढील वर्षी १ एप्रिलपासून निर्धारित मुदतीच्या आत प्राप्तिकर विवरण पत्र न सादर केल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात विवरण पत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यामध्ये कलम २३४ एफची भर टाकली आहे. जेवढा उशीर तेवढी दंडाची रक्कम वाढण्याचीही शक्यता आहे.

‘टॅक्स टू विन डॉट कॉम’चे सीईओ अभिषेक सोनी म्हणाले की, केंद्र सरकारने दंड भरण्यातही काही प्रमाणात सवलत देऊ केली आहे. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला विलंबित विवरणपत्रासाठी केवळ एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. ही दंडाची रक्कम संबंधिताला सेल्फ अॅसेसमेंट करासह जमा करावी लागणार आहे.

Leave a Comment