मुंबई : ब्रॉडबँड इंटरनेट क्षेत्रात पाऊल टाकण्याची तयारी टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओने चालवली आहे. आपल्या वेबसाईटवर जिओने चुकीने आपले आगामी प्रॉडक्ट जिओफायबरची माहिती दिली. पण ही माहिती व्हायरल झाल्यावर लगेच वेबसाईटवरुन हटवण्यात आली.
जिओ फायबर देणार १०० Mbps स्पीडमध्ये १०० जीबी डेटा!
आपल्या वेबसाईटवरील ब्रॉडबँड सेवेसंबंधीच्या पेजवर जिओने जिओफायबर या नव्या प्रॉडक्टची माहिती दिली होती. जिओफायबरचा प्रीव्ह्यू प्लॅनमध्ये दर महिन्याला १०० जीबी डेटा १००Mbps स्पीडने देण्यात येईल. ही ऑफर पहिल्या तीन महिन्यांसाठी ग्राहकांना दिली जाईल. मात्र जिओफायबरच्या राउटर इंस्टॉलेशनसाठी ४५०० रुपये ग्राहकांना द्यावे लागतील, जे ग्राहकांना नंतर परतही केले जातील.
जिओफायबरचा स्पीड १०० जीबी डेटा संपल्यानंतर १Mbps होईल. जिओफायबर सेवा लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. वेबसाईटवर लीक झालेल्या माहितीनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, सूरत, वडोदरा आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये ही सेवा दिली जाईल. जिओफायबरची एक इमेजही वेबसाईटवर दिसली. जी व्हायरल होताच डिसेबल करण्यात आली. जिओ इंस्टॉलेशन चार्जेसमध्येच मोडेमचेही चार्जेस घेतले जातील अशी शक्यता आहे.