बाईक शेअरिंग कंपनीचे चीनमध्ये दिवाळे


चीनमध्ये बाईक शेअरिंग व्यवसाय वेगाने विकसित होत असतानाच वुकोंग या बाईक शेअरिंग व्यवसायातील कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या या कंपनीतील ९० टक्के सायकली गायबच झाल्या आहेत यामुळे कंपनीला ३ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. सुरवातीला कंपनीकडे १२०० सायकल्स होत्या त्यातील आता फक्त १२० सायकली शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.

कंपनीचे संस्थापक ली हाऊई म्हणाले, त्यांच्याकडील निम्म्याहून अधिक सायकली विद्यापीठांत तर बाकीच्या सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आल्या होत्या. कंपनी सुरवातीला या साठी पैसे आकारत असे पण नंतर या क्षेत्रात आलेल्या अन्य कंपन्यांनी ही सेवा मोफत सुरू केल्याने स्पर्धा वाढली व कंपनीलाही मोफत सायकली द्याव्या लागल्या. या सायकलीवर जीपीएएस यंत्रणा बसविली गेली नव्हती त्यामुळे त्या चोरीस गेल्या तरी त्यांचा ठावठिकाणा शोधणे शक्य झाले नाही.

या क्षेत्रात आलेल्या मोबाईक व ओफो कंपन्यांना अनुक्रमे टेसेंट व अलिबाबा व एका मोबाईल कंपनीची मदत आहे. त्यामुळे या कंपन्या सायकलमधील उबेर म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याबरोबर स्पर्धा करणे वुकोंगला अवघड बनले होते. चीनमध्ये जादा लोकसंख्या व वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मोबाईकने या क्षेत्रात ३९०० कोटींची गुंतवणूक केली असून त्यांचे १० कोटी ग्राहक आहेत. चीनमधील १०० शहरात त्यांच्या अडीच कोटी सायकलींचा वापर दररोज केला जातो.

Leave a Comment