जगातील सर्वाधिक उंचीवरचे गांव वसलेय सोन्याच्या खाणींवर


पेरू मधील अॅंडीज पर्वतावर पाच किलोमीटर उंचीपर्यंत म्हणजे समुद्र सपाटीपासून ५१०० मीटर उंचीवर( साधारण १६ हजार फूट उंचीवर) वर्षानुवर्षे ३० हजार लोक रहात आहेत. जगातील ही सर्वाधिक उंचीवरची वसाहत आहेच पण हे लोक सोन्याच्या साठ्यांवर वास्तव्य करून आहेत. मात्र त्यांना रोजच्या आयुष्यासाठी आवश्यक अशा कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रिनकोनाडा नावाचे हे गांव शहर म्हटले जाते मात्र प्रत्यक्षात ती एक वस्ती आहे.

दक्षिण अमेरिकेत असूनही प्रचंड थंडी या भागात आहे कारण त्याची उंची अधिक आहे. येथे राहणारे बहुतेक सर्व मजूर आहेत. पत्राच्या शेडमध्येच ते राहतात. गावात रस्ते, पाणी, ड्रेनेज यांची कांहीही व्यवस्था नाही. येथील तापमान साधारण १.२ डिग्री पर्यंत असते. उन्हाळ्यात येथे पाऊस पडतो तर हिवाळा अधिकच भयानक असतो. हाडे फोडणारी थंडी येथे पडते. या पर्वतात सोन्याच्या खाणी आहेत मात्र येथे कोणतीही कंपनी कायदेशीर उत्खनन करत नाही. येथील सर्व कारभार अवैध रूपातच चालतो.


येथील पुरूष खाणीत काम करतात तर महिला बारीकसारीक खडकांत अडकलेले सोन्याचे कण वेचणे, दुकानदारी व वेश्याव्यवसायही करतात. येथे कोणताही कर नाही, स्थानिक सरकार नाही त्यामुळे पायाभूत सोईसुविधाही नाहीत. रस्ते नाहीत, नळ नाहीत, ड्रेनेज सिस्टीमही नाही.कंपन्यातून काम करणार्‍या मजुरांना पगार दिला जात नाही.३० दिवस मोफत काम केल्यानंतर ३१ व्या दिवशी त्यांना खिसे भरून येथील कच्चा माल नेण्याची परवानगी दिली जाते. मग त्यात सोने सापडेल किंवा नुसतीच मातीही असेल. ते त्या मजुरांच्या नशीबावर अवलंबून असते. तरीही येथे मजूर येतात. २००१ ते २००९ या काळात येथील मजुरांची संख्या दुप्पट म्हणजे ३० हजारांवर गेली आहे.

Leave a Comment